लोकसत्ता टीम
अकोला : आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पदक मिळवणारे उत्कृष्ट खेळाडू घडवण्यासाठी राज्यात ‘मिशन लक्ष्यवेध’ उपक्रम राबविला जाणार आहे. या अंतर्गत खासगी अकादमींचे सक्षमीकरण केले जाईल.
राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासह प्रतिभावंत खेळाडू तयार करण्याचे प्रयत्न आहेत. राज्यातील खेळाडूंनी ऑलिंम्पिक सारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदके प्राप्त करण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. राज्यातील खेळाडूंसाठी अद्ययावत क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडा विषयक पायाभुत सुविधा, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, खेळाडूंना पुरस्कार व प्रोत्साहन, खेळाडूंसाठी करिअर मार्गदर्शन व खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी प्रशिक्षक व संस्थांना सहकार्यासह सर्व घटक विकसित करण्याच्या उद्देशाने शासनाने “मिशन लक्ष्यवेध” या महत्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला.
‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत निवडण्यात आलेल्या ॲथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, लॉग टेनिस, रोईंग, शुटींग, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, कुस्ती आदी १२ क्रीडा प्रकारांच्या राज्यातील उत्तम खेळाडू निर्माण करणाऱ्या खासगी अकादमींना आर्थिक सहाय्य देऊन संस्थांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे.
क्रीडा अकादमीच्या कामगिरींचे गुणांकन होणार
मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खासगी अकादमींना आर्थिक सहाय्य करण्याच्या दृष्टीने संबंधित अकादमीमधील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, सहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षणासाठी उपलब्ध पायाभूत सुविधा व त्यांचा स्तर, क्रीडा साहित्य व क्रीडा अकादमीच्या कामगिरींचे गुणांकन करण्यात येईल. ३५ ते ५० गुण प्राप्त करणाऱ्या संस्था क वर्ग, ५१ ते ७५ गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ब वर्ग व ७६ ते १०० गुण प्राप्त करणाऱ्या संस्था अ वर्ग अशा प्रकारे वर्गीकरण करण्यात येणार आहे.
१० ते ३० लाख रुपये अनुदान
क वर्ग अकादमींना वार्षिक रु.१०.०० लक्ष, ब वर्ग अकादमींना वार्षिक रु.२०,०० लक्ष व अ वर्ग अकादमींना वार्षिक रु.३०.०० लक्ष आर्थिक सहाय्य, पायाभुत क्रीडा सुविधा उभारणी, क्रीडा सुविधा उन्नत करणे, प्रशिक्षक मानधन, क्रीडा व प्रशिक्षण उपकरणे आदी बाबींवर खर्च करण्यासाठी देण्यात येणार आहे. इच्छुक संस्थांनी अर्जाच्या नमुन्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन क्रीडा व युवक विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी केले आहे. या योजनेमुळे खासगी अकादमींना आर्थिक पाठबळ मिळणार असून खेळाडूंसाठी सुविधा निर्माण होणार आहे.