नागपूर : मुंबई, पुणे आणि औरंगाबाद परिसरात भरपूर उद्योग झाले आहेत. आता उद्योग तिकडे नेणे बंद करावे आणि उद्योग खात्याने ‘डेस्टिनेशन नागपूर’ असा कार्यक्रम हाती घ्यावा. त्याशिवाय विदर्भात उद्योगांची संख्या वाढणे अशक्य आहे, अशी भूमिका आमदार ॲड. अभिजीत वंजारी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत मांडली.
हेही वाचा >>> नागपूर : खळबळजनक, अज्ञात आरोपींनी चक्क पोलिसांची वाहने जाळली
राज्यात येऊ घातलेले उद्योग इतर राज्यात जात आहे. विदर्भाकडे तर उद्योजकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न होताना दिसत नाही. उद्योग आले तरी पुणे, मुंबई आणि औरंगाबाद या भागात येतात. विदर्भाकडे उद्योगाचा वेग वाढण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आला पाहिजे. विदर्भात येण्यास इच्छुक असणाऱ्या उद्योजकांना जमीन, पाणी, वीज सवलतीच्या दरात आणि कर सवलतीची विशेष योजना सुरू होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. राज्यात लाखो पद रिक्त आहेत. शिक्षण, सिंचन, कृषी अशा सर्व खात्यात पदे रिक्त आहे. ही रिक्त पदे भरण्यात आली पाहिजे. कंत्राटी पद्धतीला विरोध असून काही वर्षानंतर बेरोजगार झालेल्या युवकांनी त्यांचा प्रपंच कसा चालावावा. त्यामुळे सरकारने सर्व खात्यातील सर्व पद नियमित नोकरी भरती करण्याचा धाडसी निर्णय घ्यावा. निव्वळ घोषणा करून काही उपयोग नाही. अशा अनेक घोषणा याआधीही झाल्या आहेत, असेही ते म्हणाले.
हेही वाचा >>>नागपूर : नागपूर : यंदा ॲग्रोव्हीजनचे कृषी प्रदर्शन दाभ्यात, २५ ते २८ दरम्यान आयोजन
विदर्भातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गोंविदराव वंजारी फाऊंडेशनच्या वतीने ‘मेगा जॉब फेअर’ आयोजित करण्यात येत आहे. सोमवारी सकाळी साडे आठ ते सायंकाळी सहा वाजेदरम्यान हॉटेल रिजेन्टा, तिसरा मजला, जगनाडे, नंदनवन येथे होत आहे. यात देशभरातील ५० नामांकित कंपनींनी भाग घेतला असून सुमारे तीन हजार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असा दावा आमदार ॲड. अभिजीत वंजारी यांनी केला.