वाशीम : ज्येष्ठ निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी खारघर येथे १६ एप्रिल रोजी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. परंतु, आयोजकांनी लोकांच्या जिवांची पर्वा न करता ढिसाळ नियोजन केले. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे सदर प्रकरणी राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अमित झनक यांनी केले.
हेही वाचा – वाशीम: बिबट्याच्या बछड्यांचा क्षणभर विसावा
खारघर येथील सोहळ्याला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थित राहून केवळ शक्ती प्रदर्शन केले. परंतु, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्यांची कुठलीच व्यवस्था केली नाही. परिणामी उन्हामुळे जवळपास पन्नासपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सरकारने उत्तर देण्यासाठी दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावे आणि याप्रकरणी राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अमित झनक यांनी स्थानिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चक्रधर गोटे, सभापती वैभव सरनाईक, शहराध्यक्ष शंकर वानखेडे आदींची उपस्थिती होती.