लोकसत्ता टीम
नागपूर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जनतेने नाकारले. विरोधी पक्षनेते पद मिळवण्याएवढेही संख्याबळ कुठल्याही विरोधी पक्षाकडे नाही. त्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर राज्यातही आता आपली सत्ता येणार अशी आशा महाविकास आघाडीच्या नेत्यांना होती. मात्र जनतेने महायुतीला प्रचंड मोठे बहुमत दिले. विरोधी पक्ष अद्यापही या धक्क्यातून ते बाहेर पडलेला नाही. पाच वर्षे सत्तेबाहेर राहावे लागणार असल्याने विरोधी पक्षातील अनेक नेते नाराज आहेत.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी नुकतीच अजित पवार यांची भेट घेतली. यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी आमदार अमोल मिटकरी यांना विचारणा केली असता, शिंदे यांचा विरोधी बाकावर जीव रमत नसल्यामुळे त्यांनी अजितदादांची भेट घेतली असावी, अनेक विरोधक भेटी आहेत, अशा शब्दात चिमटा घेतला. यामुळे विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
आणखी वाचा-दादांची अनुपस्थिती, ठाकरेंचे आगमन अन् फडणवीसांची भेट अधिवेशनात काय घडले..
विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. यानंतरही विरोधकांकडून सातत्याने निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जात आहे. यादरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्याचे पाहायला मिळाले. या भेटीची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याबद्दल तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यातच या दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीवेळी उपस्थित असलेले शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रतोद सुनिल प्रभू म्हणाले की, “महाराष्ट्राचे राजकारण एक सुसंस्कृत राजकारण आहे. महाराष्ट्रातील राजकारण्यांकडे सुसंस्कृत राजकारणी म्हणून लोक बघतात. मधल्या काळात वातावरण खराब झाले होते ते महाराष्ट्रासाठी शोभनीय नव्हते. सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिलं अधिवेशन होतं. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख नागपूर येथे अधिवेशनात हजर होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या, असेही प्रभू म्हणाले. विरोधी पक्षाचे अनेक नेते सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेत असल्याने विविध चर्चा रंगल्या आहेत.
आणखी वाचा-भुजबळांचे मंत्रीपद अन् त्याचे नागपूर कनेक्शन
माझ्यावर आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा शिक्का आहे!
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेत उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्याबद्दल अभिनंदन केले. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना शुभेच्छा दिल्या. राजकारणापलीकडे काही नातं असतं. शेवटी पवार साहेब म्हणतील तीच आमची दिशा असते. माझ्यावर आदरणीय शरद पवार यांचा शिक्का आहे, असे शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.