आमदार अमोल मिटकरी व युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. आ. मिटकरींनी मोहोड यांना पाच कोटी रुपयांची मानहानीची नोटीस वकिलामार्फत पाठवली. त्यानंतरही ‘झुकेंगा नहीं’ म्हणून मोहोड आपल्या भूमिकेवर ठाम असून १० दिवसांत भांडाफोड करण्याचा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे अकोला राष्ट्रवादीतील वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.
गेल्या काही वर्षांपासून अकोला राष्ट्रवादीत अंतर्गत वाद खदखदत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्यामध्ये हे मतभेद उफाळून आले. मोहोड यांनी पाटील यांच्यापुढे तक्रारीचा पाढा वाचताना आ. मिटकरींवर कमिशनखोरीचा आरोप केला. त्याला प्रत्युत्तर देताना आ. मिटकरी यांनी आरोप करणाऱ्यांचे चरित्र तपासावे, असे म्हटले होते. त्यामुळे संतापलेल्या मोहोड यांनी आ. मिटकरींचा खरपूस शब्दात समाचार घेत आरोपांच्या फैरी झाडल्या. १० दिवसांत पुराव्यांसह आरोप सिद्ध करेल, असा इशारादेखील त्यांनी दिला. या सर्व पार्श्वभूमीवर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे महेबूब शेख यांनी अकोल्याचा दौरा करून दोघांचीही समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रदेश नेत्याचे हे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.
हेही वाचा : मंत्र्यांच्या आदेशानंतरही ‘एमकेसीएल’ बाबत आदेश नाही ; अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर शंका
आ. मिटकरी यांनी पाच कोटी रुपयांची मानहानीची नोटीस वकिलामार्फत मोहोड यांना पाठवली. त्यामुळे मोहोड यांचा पारा अधिक चढला असून काहीही झाले तरी झुकणार नाही. आ. मिटकरी यांचा १० दिवसांत भांडाफोड करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा राष्ट्रवादीतील वाद शमण्याचे नाव घेत नसून आगामी काळात हा वाद आणखी भडकण्याची शक्यता आहे.