अकोला : ‘नांदेड येथील रुग्णांच्या मृत्यू प्रकरणावरून टीका करण्याऐवजी तुमच्या काळात काय व्यवस्था होती? असा सवाल करीत राजकीय नव्हे तर व्यवहारिक मागणी करा, असा सल्ला बच्चू कडू यांनी विरोधकांना दिला आहे. सरकार कुठल्याही पक्षाचे असो पण देशाच्या ७५ वर्षांत आरोग्यासह मुलभूत सुविधा निर्माण करू शकलो नाही, याची लाज वाटली पाहिजे, अशी टीकाही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.
हेही वाचा >>> यवतमाळ: दोन युवकांना देशी कट्टे व जिवंत काडतुसांसह अटक
अकोल्यात दिव्यांग मंत्रालयाच्या कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नांदेड येथील घटनेवरून त्यांना छेडले असता ते म्हणाले,‘आरोग्य व्यवस्था सुधारणे गरजेचे आहे. देशाचा अमृत महोत्सव साजरा केला गेला. ७५ वर्षांत शेतकरी, मजुरांना घरकुल मिळाले नाही. आरोग्य व शिक्षणाची सुविधा सक्षमपणे मिळाली नाही. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळाला नाही. एकीकडे अमृत महोत्सव साजरा करीत असतांना दुसरीकडे सर्वसामान्यांना मुलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. कुठल्याची पक्षाचे सरकार असो, याची लाज वाटली पाहिजे.’ काही जण मंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत. त्यांच्या काळात काय व्यवस्था होती? असा प्रश्न आहे. राजकीय मागणी करू नये. व्यवहारिक मागणी करणे आवश्यक आहे. अर्थसंकल्पात आरोग्य सुविधेसाठी योग्य तरतूद करणे गरजेचे आहे, असे बच्चू कडू म्हणाले.