बुलढाणा: राजकीय क्षेत्रात काहीही घडामोडी होवो, काहीही चर्चा सुरू असली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरून जावे लागेल असे मला वाटत नाही. अजित पवार मुख्यमंत्री होतील असे तूर्तास तरी शक्य नसल्याचे चित्र आहे. मात्र आताची राजकीय परिस्थिती लक्षात घेता मंत्रिमंडळ विस्तार आता २०२४ नंतरच होऊ शकतो. ही भाकिते आहेत सत्ताधारी पक्षासोबत असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांची.
बुलढाणा तालुक्यातील धाड येथे महाराष्ट्र दिनी संध्याकाळी आयोजित कार्यक्रमाला आमदार कडू यांनी हजेरी लावली. यावेळी भाजपा आमदार श्वेता महाले यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर रात्री उशिरा प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना त्यांनी ही भाकिते केली. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर आपल्या ‘स्टाईल’ने भाष्य करीत परखड मते व्यक्त केली. तसेच मुक्त शाब्दिक फटकेबाजी केली. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ‘जोपर्यंत मोदी व शहा यांचा पाठींबा तोपर्यंत शिंदेंचे पद कायम’ या विधानावर कडू यांनी मार्मिक भाष्य केले. या विधानाशी असहमती दर्शवून कडू म्हणाले की, एकनाथ शिंदेंना पदावरून जावे लागेल, असे मला वाटत नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली पुढील विधानसभा लढविली तर निश्चितच जनता युतीच्या पाठीमागे उभी राहील असे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सत्तासंघर्ष प्रकरणाचा निकाल काहीही लागला तरी, त्याचा राज्य सरकारवर काही परिणाम होणार नाही. ‘त्या’ संभाव्य निकालाचा परिणाम मर्यादितच राहील, असा दावा त्यांनी केला. निकालाचा लोकांवर परिणाम होईल असं मला वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय भूकंप अन वज्रमूठ…
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अलीकडे झालेल्या भेटीवर आमदार कडू यांनी मजेदार उत्तर दिले. या भेटीत काय शिजले हे सांगता येणार नाही. पवारांबद्धल काय सांगणार? असा प्रतिप्रश्न करून यातून राजकीय भूकंपदेखील होऊ शकतो. याचबरोबर ‘बारसू’ मध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगादेखील निघू शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तविली. अजित पवार मुख्यमंत्री होण्याची शक्यता फेटाळून लावली. पाहिले देवेंद्रजी, नंतर उद्धवजी, नंतर एकनाथजी असे तीन मुख्यमंत्री झालेत. आता अजितदादा झालेच तर तो राजकीय कळस ठरेल.
वज्रमूठ सभाविषयी विचारणा केली असता, मुळात आंदोलक असलेल्या या नेत्याने अर्थगर्भित विधान केले. सध्या आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे, (तिन्ही पक्षाचे) नेते भाषणे करीत आहेत. मात्र ही वज्रमूठ कधी तुटेल, कोणता नेता कुठे जाईल, याची खात्री नाही. या सभांना तोबा गर्दी होणे यात काहीच नवल नाही. सभांना गर्दी कशी होते हे सर्वांनाच माहीत आहे. ‘गाडी घोडे’ असले की गर्दी होणारच अशी टिप्पणी कडू यांनी केली.
हेही वाचा – अमरावती : अनैतिक संबंधांची वाच्यता होताच त्याने रचला हत्येचा कट अन् मग…
राहुल गांधींना मानतो,पण…
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अभूतपूर्व ठरली, जनतेत त्यांच्याविषयी आस्था निर्माण झाली. आपण त्यांना मानलं, पण याचा पक्षाच्या नेत्यांवर काय परिणाम झाला का? हा खरा प्रश्न आहे. काँग्रेसचे नेते गायब होत आहे, पक्ष सोडून जात आहे, अशी कडू यांनी खिल्ली उडविली.