नागपूर : गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी पैसे घेतल्याचा खुद्द सत्ताधारी गटाचे आमदार रवी राणा यांनी केलेल्या आरोपाने संतापलेले माजी मंत्री बच्चू कडू यांनी या मुद्यावर तीन महिन्यापूर्वी सत्तेत आलेल्या शिंदे-भाजप सरकारलाच आव्हान देत राणांच्या आरोपाबाबत भूमिका स्पष्ट करावी,अन्यथा वेगळी भूमिका घ्यावी लागेल,असा इशारा दिला. राणांच्या वक्तव्याने दुखावलेले अनेक आमदारही संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील अपक्ष आमदार व माजी मंत्री बच्चू कडू आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यात खोके व मोफत किराणा वाटपावरून वाद सुरू आहे. विशेष म्हणजे या दोन्ही आमदारांचा शिंदे-भाजप सरकारला पाठिंबा आहे. मात्र तरीही दोघांकडूनही परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करीत असून त्याची पातळीही खालावली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> शिवसेनेतील फूट ; आता शपथपत्रावरून वाद ?

गुवाहटीला गेलेल्या सेनेच्या फुटीर गटावर चाळीस खोके एकदम ओके असा आरोप उद्धव ठाकरे गटाकडून केला जात आहे. त्याचाच हवाला देऊन राणा यांनी बच्चू कडूंवर पैशाच्या देवाणघेवाणीचा अप्रत्यक्ष आरोप केला होता. तर कडू यांनीही किराणा वाटप करून निवडणू लढवणारे करणारे महाठग असा आरोप राणा यांचे नाव न घेता केला होता. त्याला राणा यांनी पुन्हा प्रतिउत्तर देताना गुहाटीचा मुद्दा कोढल्याने कडू यांनी त्यांच्याविरोधात  पोलिसात तक्रार दाखल केली होती. आज  बुधवारी  नागपूर येथे पत्रकार परिषदेत रवी राणा यांचा समाचार घेतला. रोणा यांनी केलेले आरोप गंभीर असून याबाबत शिंदे व फडणवीस या दोन्ही नेत्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी,अन्यथा वेगळी भूमिका घ्यावी लागेल. राणा यांच्या वक्तव्याने दुखावलेले अनेक आमदार संपर्कात आहे,असा दावा कडू यांनी केला.

गेल्या २० वर्षांंपासून सार्वजनिक जीवनात काम करीत आहे. पक्षाशिवाय, झेंडय़ाशिवाय आणि पैसे खर्च न करता चार वेळा निवडून आलो.  राणा यांनी केलेल्या आरोपामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. ते सत्ताधारी आमदार असल्याने ते करीत असलेल्या आरोपावर शिक्कामोर्तब होते.

ते कोणाच्या जीवावर बोलत आहे, हे तपासणे गरजेचे आहे. राणांनी केलेले आरोप एकटय़ा बच्चू कडूवर नाही, तर त्यामुळे जे गुवाहाटीला गेले आणि त्यानंतर सत्ता स्थापनेत सहभागी झाले. त्या ५० आमदारांवर आहे. त्यामुळे या सर्व आमदारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या आरोपांमुळे मुख्यमंत्री  शिंदे, उपमुख्यमंत्री  फडणवीस, पंतप्रधान  मोदी आणि   गृहमंत्री  शाह यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.  एकंदरीतच या लोकांना पैसे देऊन आमदारांना गुवाहटीला नेले, असा त्याचा अर्थ होऊ  शकतो. राणा यांनी जे आरोप केले, त्याची सत्यता सांगा अशी नोटीस मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार असून त्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट न केल्यास आम्ही सर्व आमदार १ नोव्हेंबरला आमची भूमिका स्पष्ट करू, असा इशाही त्यांनी दिला.

अल्टिमेटमकडे लक्ष देत नाही – राणा

या सर्व प्रकरणावर आमदार रवी राणा म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे नेते आहेत. कोण काय अल्टिमेटम देते याकडे मी लक्ष देत नाही.  जेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलावतील, तेव्हा अध्र्या रात्री त्यांच्याकडे जाईल. ते जे सांगतील त्याचे पालन करीन, असे आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे.

..तर पुरावे देईल

रवी राणा यांच्या आरोपानंतर आक्रमक झालेले बच्चू कडू यांनी राणा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, राणा यांनी जे आरोप केले, त्याचे पुरावे १ नोव्हेंबर देण्याची मागणी केली आहे. एका बापाची औलाद असेल तर पुरावे देईल, अशी टीकाही त्यांनी केली.

हनुमान चालिसा आंदोलन चुकीचेच

राणा यांच्या या आंदोलनाला आणि बच्चू कडू यांच्यावरील आरोप मागे कोणाचे बळ आहे, असा प्रश्न विचारले असता ते म्हणाले, राणा दाम्पत्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठनाचे आंदोलन करणे हे चुकीचे होते. धार्मिक गोष्टी ही वैयक्तीक बाब आहे. कोणाच्या घरासमोर जावून अशाप्रकारे हनुमान चालिसा पठन करणे चुकीचे आहे. माध्यमांनी यामागे कोण आहे, हे शोधून काढावे, असेही ते म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla bacchu kadu warn shinde fadnavis government after ravi rana allegation zws