अमरावती : राजा बनल्यानंतर त्या राजाची झोपेची वेळ ठरलेली असेल आणि ठरलेल्या वेळेतच लोकांना भेटायचे, असे त्याने ठरवलेले असेल, तर ते लोकांना पटत नाही. आळशी राजाचे राज्य फार काळ टिकत नसते, हे दिसून आले आहे, अशा शब्दात आ. बच्चू कडू यांनी टीका केली.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आमदार बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांना साथ द्यावी, असे आवाहन केले होते. बच्चू कडू हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे अपंगांसाठी मंत्रालय झाले, याचा आनंद आपल्याला आहे. या निमित्ताने त्यांचे खूप अभिनंदन करतो. बच्चू कडू हे शेतक-यांसाठी, अपंगांसाठी लढणारे नेते आहेत. उद्धव ठाकरे यांचे त्यांच्यावर आणि त्यांचेही उद्धव ठाकरेंवर प्रेम आहे. ते ठाकरेंनाच साथ देतील, असे खैरे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले होते. मात्र, बच्चू कडू यांनी खैरे यांच्या वक्तव्यावर नापसंती व्यक्त केली आहे. एका कार्यक्रमात बोलताना आ. कडू यांनी ‘आळशी राजा’चा उल्लेख करीत उद्धव ठाकरे यांना नाव न घेता टोला लगावला.
हेही वाचा: अमरावती शहराला ८ तारखेपर्यंत पाणी पुरवठा नाही; कारण…
जेव्हा मंत्रिपदासाठी शर्यत लागली होती, तेव्हा प्रत्येक जण चांगले खाते मागत होता. सर्वांमध्ये वजनदार खाते मागण्याची स्पर्धा होती. पण, मी राज्यातील पहिला माणूस होतो, ज्याने अपंग मंत्रालय मागितले, असे बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू यांच्या पाठपुराव्यानंतर अपंग मंत्रालय स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यामुळे बच्चू कडू यांची नाराजी दूर झाल्याची चर्चा आहे. बच्चू कडू यांनी मंत्रिपदावरून जाहीर नाराजी व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे यांनी राज्यात महिला मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावी, अशी इच्छा प्रदर्शित केली आहे, पण त्यांनी स्वत: मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यापेक्षा तेव्हाच महिलेला हे पद दिले असते, तर ते योग्य ठरले असते, असा टोला कडू यांनी लगावला आहे.