अमरावती : मंत्रीपद न मिळाल्याने जाहीर नाराजी व्यक्त करणारे आमदार बच्चू कडू यांनी आता मंत्रीपदावरील दावा सोडण्याची घोषणा केली आहे. मंत्रीपदासाठी मोठी रांग आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपले मित्र आहेत. मित्राची अडचण होऊ नये, म्हणून आपण मंत्रीपदाचा दावा सोडत आहोत. आपल्याला मंत्रीपद नको, त्याऐवजी प्रहार जनशक्ती पक्षाचे दुसरे आमदार राजकुमार पटेल यांना सहजरीत्या शक्य होत असेल, तर राज्यमंत्रीपद किंवा समितीचे अध्यक्षपद मिळावे, अशी अपेक्षा आहे, असे बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
बच्चू कडू यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आज ते नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बैठकीला हजर राहण्यासाठी दिल्लीत पोहचले. बच्चू कडू म्हणाले, ‘ मंत्रिमंडळाचा विस्तार बराच लांबला आहे. मंत्रीपदासाठी अनेक जण इच्छूक आहेत. त्यामुळे ओढाताण होत आहे. मंत्रिमंडळात तुम्ही हवे आहात, असे एकनाथ शिंदे यांनी आपल्याला सांगितले. पण मी त्यांची अडचण समजू शकतो. त्यामुळे आपण मंत्रीपदावरील दावा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.’
हेही वाचा >>>नागपूर: सौदी अरेबियातून दहशतवादी संघटनेशी जुळला अफसर, कोट्यवधीचा निधी जमवण्याची जबाबदारी
हेही वाचा >>>सोमय्या यांच्यावर महिला नेत्यांची टीका, म्हणाल्या ‘ त्यांचे आचरण भाजप संस्कृतीप्रमाणेच’
बच्चू कडू म्हणाले, ‘ आपल्याला एनडीएच्या बैठकीचे निमंत्रण मिळाले. त्याचा आदर राखून आपण बैठकीला हजर राहण्याचा निर्णय घेतला. पण, आम्ही एनडीएमध्ये सामील होण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. यासंदर्भात चर्चा केली जाईल, त्यानंतर ठरवू.’लोकसभा निवडणुकीच्या तयारीविषयी बच्चू कडू म्हणाले, ‘ अमरावतीसह चार ते पाच जिल्ह्यांमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष मजबूत आहे. लोकसभा निवडणूक लढवावी, अशी पक्षाची इच्छा आहे. आपण स्वत: अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. फार कमी मतांनी पराभव झाला. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबतच चर्चा केली जाईल. आपण भाजपचे थेट मित्र नाही, तर भाजपचे मित्र असलेल्या एकनाथ शिंदे यांचे मित्र आहोत.’