लोकसत्ता टीम
अमरावती : अचलपूरचे प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी आपल्या जीवाला धोका असल्याबाबत जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे पत्र दिले आहे. आपला अपघात झाला, अशी अफवा काही लोकांकडून पसरवली जात असल्याचेही या पत्राच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. या गंभीर प्रकारामुळे प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
गोपनीय माहितीनुसार आपल्या जीवाला धोका असल्याचे बच्चू कडू यांनी पत्रात म्हटले आहे. बच्चू कडू यांचे निकटवर्तीय, कार्यकर्त्यांना फोन करून बच्चू कडू यांचा अपघात झाला, असे सांगितले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी आणि असे कृत्य करणाऱ्यांना हुडकून काढावे, अशी मागणी बच्चू कडू यांनी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडे केली आहे.
आणखी वाचा-धक्कादायक! ‘एनडीए’ सरकारच्या काळात बँकांच्या फसवणुकीत १५ पट वाढ!
आपण बाहेरगावी गेल्यानंतर निकटवर्तीयांना, मित्रांना काही लोकांकडून फोन केले जात आहेत. त्यात बच्चू कडू यांचा अपघात झाला, असे सांगण्यात येत आहे. असे फोन करणारे कोण आहेत, त्यांचा हेतू काय, हे आपल्याला माहीत नाही, पण अशा प्रकारची अफवा पसरविणाऱ्यांच्या विरोधात तत्काळ कारवाई झाली पाहिजे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. आतापर्यंत पंधरा ते वीस वेळा हे प्रकार घडून आले आहेत. हे कुणीतरी मुद्दाम करीत आहे, त्याचा शोध पोलिसांनी घ्यावा. बाहेरगाव गेल्याबरोबर कार्यकर्त्यांना फोन येतात. बच्चू कडू यांचा अपघात झाला, आता बघा, असे फोन करणारी व्यक्ती सांगते. या प्रकारामुळे लगेच घाबरून जाण्याचे काही कारण नाही. कुणी काही प्लानिंग केले असेल, पण आपण सावध राहू, असे बच्चू कडू यांनी सांगितले आहे.
आमदार बच्चू कडू हे महायुतीचे घटक असले, तरी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपच्या विरोधात उघडपणे भूमिका घेतली. त्यांच्या या कृतीची राज्यभर चर्चा झाली. भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवाराने लढत दिली. यात प्रहारच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. नवनीत राणा यांचा पराभव झाला. बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांचा पराभव हे, आपले लक्ष्य असल्याचे सांगितले होते.
आणखी वाचा-सावधान! पूर्व विदर्भात डेंग्यूग्रस्तांची संख्या चौपट
मे महिन्यात प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या घरासमोर अज्ञात व्यक्तींनी कारच्या काचा फोडल्या होत्या. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हा प्रकार घडला होता. या प्रकाराच्या चौकशीची मागणी दिनेश बुब यांनी केली होती. याप्रकरणी पोलिसांत तक्रार देखील करण्यात आली होता. आता बच्चू कडू यांच्या विषयी अफवा पसरविण्यात येत असल्याने प्रहारच्या कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत.