अमरावती : आता निवडणुका जवळ आल्‍या आहेत. त्‍यामुळे मुद्दे संपले की विविध रंगांचे झेंडे बाहेर येतात. मतांच्‍या धृवीकरणासाठी विशिष्‍ट धर्माला लक्ष्‍य केले जाते, अशी टीका आमदार बच्‍चू कडू यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खासदार नवनीत राणा यांना ठार मारण्‍याची धमकी देण्‍यात आल्‍याच्‍या घटनेवर प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना बच्‍चू कडू यांनी राणा दाम्‍पत्‍याचा नामोल्‍लेख टाळत त्‍यांच्‍यावर टीका केली. आता निवडणुका जवळ आल्‍या आहेत. यांना आता एका धर्माला लक्ष्‍य करावेच लागणार आहे. कुठे डाळ शिजली नाही, तर वेगवेगळ्या रंगाचे झेंडे बाहेर निघतील, असे कडू म्‍हणाले.

हेही वाचा – रणजी करंडक : मध्यप्रदेशला पराभूत करत विदर्भ संघ अंतिम फेरीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभावशाली व्‍यक्तिमत्‍व या देशात आहे. त्‍यांच्‍याच सरकारमध्‍ये एका खासदाराला ठार मारण्‍याची धमकी दिली जात असेल, तर कायदा व सुव्‍यवस्‍था कुठे आहे, असा सवाल बच्‍चू कडू यांनी केला. दिल्‍लीवरून किंवा एखाद्या गावातून धमकी आली असती, तर आपण मान्‍य केले असते, पण थेट विदेशातून धमकी येते, याला काय म्‍हणावे. पाकिस्‍तान, अफगाणिस्‍तानमधून धमकी येत असेल, तर यामागे कोण आहे, याचा शोध घेतला पाहिजे, असे बच्‍चू कडू म्‍हणाले.

हेही वाचा – खासदार नवनीत राणा यांना पुन्‍हा जिवे मारण्‍याची धमकी; पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून…

भाजप सर्व जागा लढविणार

भाजप सगळ्याच जागा कमळ या चिन्हावर लढवणार असल्याचा मोठा दावा देखील बच्चू कडू यांनी केला आहे. भाजप सगळ्याच जागा लढवणार असून, काही ठिकाणी उमेदवार मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे असतील, असे बच्चू कडू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आमची फार काही राजकीय मैत्री नाही. आम्ही फक्त विकासासाठी शिंदे यांच्यासोबत आहोत. आमची राजकीय बांधिलकी कोणासोबतही नाही. आमची बांधिलकी फक्त जनतेसोबत आहे. जनता म्हणेल त्‍या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ, असेही बच्चू कडू यांनी सांगितले. राज्यात सगळ्याच जागा भाजप लढवू शकते. मात्र, काही ठिकाणी उमेदवार हे एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे लोक राहू शकतात. त्या ठिकाणी चिन्ह मात्र कमळ राहू शकते, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla bachu kadu criticizes navneet rana what did they say mma 73 ssb