अमरावती : दर्यापूरपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या लाखापूर फाट्याजवळ कापूस वेचणी करून परतणाऱ्या मजुरांच्या ट्रॅक्टरला आमदार बळवंत वानखडे यांच्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने दर्यापूर सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष मोहम्मद खालिक यांचा घटनास्थळी मृत्यू झाला असून पाच मजूर जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी घडला.
दर्यापूर शहरातील एका शाळेच्या स्नेहसंमेलनाला उपस्थित राहण्यासाठी आमदार यशोमती ठाकूर दर्यापूरला येत होत्या यावेळी त्यांच्या समवेत आमदार बळवंत वानखडे व काँग्रेस पदाधिकारी होते. आमदार बळवंत वानखडे यांचे वाहन त्यांच्या ताफ्यामध्ये होते. ट्रॅक्टरमधून मोहम्मद खालीक हे शेतमजुरांसह दर्यापूरकडे येत होते. बळवंत वानखडे यांच्या वाहनाची ट्रॅक्टरला जोरदार धडक बसली. या अपघातात मोहम्मद खालीक यांचा जागीच मृत्यू झाला. मजुरांपैकी पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींवर अमरावती आणि दर्यापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा – नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांना ५ वर्षाचा कठोर कारावास
हेही वाचा – बुलढाणा : साखरखेर्डा परिसरात ‘एक दुजे के लिए’! प्रेमीयुगलाची आत्महत्या, मुलगी अल्पवयीन
मी नागपूरवरून दर्यापूरला येत असताना यशोमती ठाकूरसुद्धा दर्यापूरला कार्यक्रमात येणार असल्याचे समजल्यावरून माझ्या वाहनातून त्यांच्या वाहनात बसलो. यावेळी माझ्या वाहनामध्ये माझे सचिव व चालक हे दोघे जण होते. लाखापूर फाट्याजवळ मजुरांचा ट्रॅक्टर हा रस्त्यावर उभा होता. चालकाला ही बाब लक्षात न आल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. अपघातात आमचे सहकारी मोहम्मद खालीक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, अशी माहिती आमदार बळवंत वानखडे यांनी दिली.