गोंदिया : मंडळ आयोग स्थापन झालं तेव्हा देवेंद्र फडणवीस जन्मालासुद्धा आले नव्हते. त्यांनी तर राज्यातील बऱ्याच समाजांच्या भावनेशी खेळ मांडला आहे. २०१४ विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी धनगर समाजाला, मराठा समाजाला टिकणारे आरक्षण, लिंगायत समाजाला आरक्षण देऊ म्हणून सांगितलं होतं, अद्यापपर्यंत दिलं का ? उलट मराठा कुणबी, असे दोन समाजांत तेढ निर्माण केलं आहे. २०१४ मध्ये माझं सरकार आणा, मी तुम्हाला वेगळा विदर्भ करून देणार. वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस हे आजही अविवाहित आहेत, अशी खोचक टीका शिवसेनेचे (उबाठा) नेते आमदार भास्कर जाधव यांनी केली.
भास्कर जाधव गोंदिया येथील शिवसेनेच्या जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात आले असता माध्यमांशी बोलत होते. राज्यातील अशा पलटुरामांना जनता पुढील निवणुकीत धडा शिकवणारच आहे. येत्या निवडणुकांमध्ये सरकारचं आरोग्य नागरिकांनी बिघडवावं, असं आवाहनही या प्रसंगी जाधव यांनी केले.
मराठा आरक्षणावर एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने छगन भुजबळांना बोलावून सांगितले की, तुम्ही जामिनावर आहात, त्यामुळे आक्रमक व्हा म्हणून भुजबळ आक्रमक झालेत. त्यामुळेच सध्या राज्यात जरांगे पाटीलविरुद्ध भुजबळ असा सामना पाहायला मिळत आहे.
२०२४ च्या निवडणुका आता जवळ आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाने आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गोंदिया विधानसभा मतदारसंघावर आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना ठाकरे गटाचा दावा केला असून २०२४ च्या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार येथून लढवणारच असल्याचं देखील त्यांनी म्हटलं.
हेही वाचा – यवतमाळ : प्रेमाच्या आणाभाका एकीशी अन घरोबा दुसरीसोबत…
भास्कर जाधव यांच्या मतदारसंघात मंजूर कामाचे त्यांचे कार्यकर्ते भूमिपूजन करतात, असा आरोप उदय सामंत यांनी केला होता. त्यावर भास्कर जाधव यांनी उत्तर दिलं. त्यांनी म्हटलं की, माझ्या मतदारसंघामध्ये जी मंजूर झालेली कामे आहेत ती मविआ सरकारमधली आहेत. त्या काळातल्या मंजूर कामांवर या नियमबाह्य आणि विश्वासघाती सरकारने स्टे आणला होता. मी उच्च न्यायालयात जाऊन सर्व आमदारांच्या कामांवरील स्टे उठवला. आज उदय सामंत मंत्री झाले म्हणून त्यांना काही अभ्यास आहे असं नाही. ते जर असे बोलले असतील तर मी त्यांचा मतदारसंघात जाऊन समाचार घेईन, सोडणार नाही, असेही भास्कर जाधव यावेळी म्हणाले.