वर्धा : शनिवारचा आमदार दादाराव केचे यांनी घेतलेला दहीहांडीचा कार्यक्रम भाजपच्या मतभेदाचे प्रदर्शन ठरणार का,अशी चर्चा होत आहे.आमदारांनी पक्षाच्या बॅनरवर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.त्यास आता या भागात चांगलेच चर्चेत असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे यांची उपस्थिती नव्हती.एवढेच नव्हे तर पत्रिका व पोस्टरवर पण वानखेडे झळकले नाहीत.सध्या त्यांची कामे व कोट्यवधी रुपयाचा आर्वीत आणलेला निधी याचीच चर्चा होते.
हेही वाचा >>> परीक्षा घेताच कशाला? सरळ बोली लावून पदाचा लिलाव करा; पेपरफुटीमुळे परीक्षार्थींचा संताप
या मतदारसंघातील भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांचे नाव घेणे सुरू झाल्यावर केचे यांनी जाहीर आगपाखड केली होती.खुद फडणवीस यांनी मग केचे यांना धीर दिल्याचे सर्वश्रुत आहे.मात्र शनिवारी त्यांना केचे यांनी टाळून परत जखम ताजी केली.येथील भाजपचे काही सांगतात की हे दोघे कार्यक्रमात एकत्र आल्यास वानखेडे हेच गर्दी खेचून घेतात.तेव्हा केचे हिरमुसले होतात. हे टाळण्यासाठी वानखेडे यांना बोलावले नसणार. या दिवशी घरीच असलेल्या वानखेडे यांना याच कार्यक्रमात आलेले खासदार रामदास तडस भेटायला गेले. त्यामुळे मतभेद असल्याचे स्पष्टच झाले.वानखेडे यांनी यावर भाष्य करण्याचे टाळले तर आ. केचे यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.