लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्धा : भाजपची पहिली यादी जाहीर झाली. त्यात नाव असणारे कामाला लागले तर नाव नसणारे विद्यमान यांच्या पोटात भीतीचा गोळा उमटला. ते धावाधाव करीत असल्याचे चित्र आहे. मात्र भाजप अंतर्गत गुंता असलेल्या काही जागा अद्याप जाहीर झालेल्या नसतानाही एका उमेदवाराने आपली उमेदवारी जाहीर करीत अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त पण जाहीर केला आहे.

आर्वी मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार दादाराव केचे यांचे नाव पक्षाने जाहीर केले नाही. पण आज त्यांच्या नावाचा मेसेज फिरला. केचे हे २८ ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करणार. पक्षाच्या ए बी फॉर्मवर. यावर विचारणा केल्यावर दादाराव केचे म्हणाले की, हो मी या दिवशी अर्ज दाखल करीत आहे. उदया तसे येईलच. केचे यांचा हा आत्मविश्वास भल्याभल्यांना बुचकळ्यात टाकणारा ठरत आहे.

आणखी वाचा-‘दाना’ चक्रीवादळाचा धोका! कोणी दिले हे नाव, काय आहे अर्थ?

कारण उमेदवारी पक्की अशी चर्चा ज्यांच्याबाबत होत आहे ते केचे यांचे स्पर्धक सुमित वानखेडे याबाबत बोलायला तयार नाहीत. ते म्हणतात की, परीक्षा द्यायची, निकाल लागेल तो लागेल. त्यांचे हे बोल आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात विश्वासू अशी केवळ भाजप मध्येच नव्हे तर सर्वत्र ओळख दिल्या जात असलेले वानखेडे यांच्या उमेदवारीचे मग काय, असा प्रश्न आता चर्चेत आला आहे. वानखेडे हेच आर्वीचे उमेदवार राहणार, असे त्यांच्या कार्याचा झपाटा व आणलेला हजारो कोटी रुपयाचा निधी यामुळे उघड म्हटल्या जाते. एक निगर्वी व सुसंस्कृत व्यक्ती अशी ओळख देत आर्वी शहरात त्यांनी क्रेझ निर्माण केली होती. पण त्या लाटेवर मात करीत केचे आज स्वतः उमेदवारी जाहिर करून बसले आहे. त्यामुळे फडणवीस केचे यांच्या दबावतंत्रास झुकले काय, अशीही आज चर्चा होत आहे.

आणखी वाचा-‘लाडकी बहीण योजना’ याचिकाकर्त्यांचा खळबळजनक दावा, म्हणाले “माझ्या जीवाला…”

दोन दिवसापूर्वी केचे यांनी मुंबईत फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी प्रस्तावित कार्यकर्ता मेळावा रद्द केला. सकारात्मक चर्चा झाल्याने मेळावा रद्द करण्यात आल्याचे कारण त्यांनी खुल्या मेसेज मधून पाठविले होते. आता त्यांनी थेट अर्ज दाखल करण्याची तारीख जाहिर करीत मी सांगतो तसेच होणार असा संदेश दिला आहे. कारण एक महिन्यापासून त्यांनी मी १०० टक्के उमेदवार राहणार अशी खात्री देणे सूरू केले होते. आता पक्षाच्या अधिकृत यादीकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla dadarao keche himself announced that he will file an application for bjp on 28th pmd 64 mrj