बुलढाणा : अमरावती विद्यापीठांअंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यात उपकेंद्र कार्यान्वित करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली. मात्र विधानपरिषद सदस्य धीरज लिंगाडे यांनी उपकेंद्र नकोच असे सांगून बुलढाण्यासह अकोला व वाशीम जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी केली आहे. ही मागणी करून त्यांनी एक नवीन व संवेदनशील विषय ऐरणीवर आणला आहे.
बुलढाणा येथे प्रसिद्धी माध्यमांसोबत संवाद साधताना ते म्हणाले, लाखो नागरिकांचे आराध्य दैवत संत गजानन महाराज यांच्या नावाने हे विद्यापीठ स्थापन करण्यात यावे. अमरावती विद्यापीठाचे पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र, वाढता कामाचा भार, भौगोलिक अंतरामुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास, आदी बाबी लक्षात घेता उपकेंद्र कुचकामी ठरणार आहे. यामुळे बुलढाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणे काळाची गरज ठरली आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात आपण सभागृहात ही मागणी रेटणार असल्याचा निर्धार लिंगाडे यांनी बोलून दाखविला.
हेही वाचा >>>नागपूर: सॉरी मम्मी-पप्पा.. ड्रग्सच्या व्यसनाने युवकाची आत्महत्या
मंत्र्यांनी दिशाभूल केली, जाब विचारणार
बुलढाण्यात कागदोपत्री मंजूर वैदयकीय महाविद्यालयाबद्दल विचारणा केली असता त्यांनी वैद्यकीय तंत्रज्ञान मंत्री गिरीश महाजन यांना चांगलेच फैलावर घेतले. बुलढाण्यात नुकतेच एका कार्यक्रमात आले असता ना. महाजन यांनी, “याच शैक्षणिक सत्रापासून बुलढाण्यात प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल,” असे सांगितले होते. हा सरळसरळ दिशाभूल करण्याचा व वाट्टेल ते बोलण्याचा प्रकार आहे. ते आम्हाला आणि बुलढाणेकराना मूर्ख समजतात काय? असा संतप्त सवाल आ. लिंगाडे यांनी केला. इमारत, कर्मचाऱ्यांचा पत्ता नाही तर प्रवेश देणार कसे आणि कुठे? असा सवाल त्यांनी केला. मंत्र्यानी जवाबदारीने बोलले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी पत्रपरिषदेत बोलून दाखविली. पावसाळी अधिवेशनात आपण मंत्री व सरकारला याचा जाब विचारणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>>मान्सून दाखल होऊनही विदर्भात पेरण्या खोळंबलेल्याच; ‘ही’ आहेत कारणे
नागपूरचा विकास म्हणजे विदर्भाचा विकास नव्हे
पश्चिम विदर्भाच्या विकासाच्या अनुशेषाबद्दल छेडले असता, या सरकारने केवळ आणि केवळ नागपूरसाठी भरमसाठ निधी उपलब्ध करून दिला आहे. याची आकडेवारीच त्यांनी सादर केली. सध्या नागपूर शहर व जिल्ह्यात तब्बल १ लक्ष १० हजार कोटी रुपयांची कामे सुरू आहे. या तुलनेत उर्वरित विदर्भ प्रामुख्याने पश्चिम विदर्भाला नगण्य निधी देऊन बोळवण करण्यात येत आहे. नागपूरचा विकास म्हणजे विदर्भाचा विकास नव्हे याचे भान सरकारने ठेवावे असा सल्ला त्यांनी राज्यकर्त्यांना दिला. पावसाळी अधिवेशनात पश्चिम विदर्भासाठी ५० कोटी रुपयांचे विशेष ‘पॅकेज’ जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह राजपूत, नितीन जाधव हजर होते.