बुलढाणा पालिकेच्या सुमारे एक वर्षाच्या प्रशासकीय राजवटीत झालेल्या विकासकामांचा आढावा आमदार धीरज लिंगाडे यांनी बुधवारी घेतला. विधानपरिषद सदस्य लिंगाडे आणि मुख्याधिकारी गणेश पांडे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात दीड तास चाललेली बैठक वादळी ठरल्याचे वृत्त आहे. आ. लिंगाडे यांनी मुख्याधिकारी पांडे यांच्या एक वर्षाच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. इंग्रजकालीन स्वच्छ-सुंदर बुलढाणा शहराची दुरवस्था झाल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनातील एका विशेष कक्षात बुधवारी दुपारी या बैठकीला प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी एच पी यांच्या आदेशावरून लावण्यात आलेल्या बैठकिला निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते व पालिकेचे विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी आ. लिंगाडेंनी शहर व्यवस्थापनाशी संबंधित विविध मुद्यांवर प्रश्नांचा भडिमार केल्याचे सांगितले जात आले. मुख्याधिकारी तथा प्रशासक पांडे यांनी बुलढाणा शहरातील सर्व पाइपलाइनच्या कामाचा तपशील सांगितला. या कामाबद्दल नागरिकांच्या प्रचंड तक्रारी असल्याचे सांगितल्यावर पांडे यांनी त्यांच्यापरीने उत्तरे दिली. शहरातील पालिका शाळा क्र. २ ला लागून बांधकाम करण्यात येणाऱ्या दुकानांचा (गाळ्यांचा) मुद्दाही वादळी ठरल्याचे वृत्त आहे. या कामासाठी विकास आराखड्यात शासनाकडून ‘मायनर मॉडिफिकेशन’ केले आहेत का? असा थेट प्रश्न आ. लिंगाडेंनी केल्यावर पांडे यांनी, “मला अधिकार आहे,” असे सांगितले. यावेळी लिंगाडे यांनी शहरातील दैनंदिन साफसफाई, अनियमित पाणीपुरवठा व वितरण व्यवस्थेतील त्रुटी, शहरातील बेकायदेशीर होर्डिंग या गंभीर मुद्यांवर प्रश्नांचा भडीमार केल्याचे वृत्त आहे.
हेही वाचा >>>सावधान..! सायबर गुन्हेगारीत महाराष्ट्र चौथा; केंद्रीय गृहमंत्रालयाचा अहवाल
पालिकाच अनाधिकृत बांधकाम करत असेल तर…
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आ. लिंगाडे यांनी संक्षिप्त तपशील सांगितला. शहरात घाणीचे साम्राज्य असून नाले व रस्त्यांची नियमित सफाई होत नाही. घंटागाडी नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचत नाही. सफाईचे काम कोण करतात, यावर मुख्याधिकारी व प्रशासक पांडे यांचे साफ दुर्लक्ष आहे. पाइपलाइनच्या कामाबद्दल नागरिकांच्या मोठ्या तक्रारी असून ते त्रस्त झाले आहेत. पालिका शाळा क्रमांक २ जवळील बांधकाम कोणत्याही परवानगीशिवाय करण्यात आले. याबाबत विचारले तर मुख्याधिकारी म्हणतात “मला अधिकार आहे.” त्यांना हा अधिकार कोणी दिला, असा संतप्त सवाल आ. लिंगाडे यांनी यावेळी केला.