वर्धा : महिला बचत गट भवनाची संकल्पना मांडून आमदार डॉ.पंकज भोयर यांनी महिलांना हक्काचे व्यासपीठ दिले, अशी पावती खा.रामदास तडस यांनी दिली आहे.राज्यात महिला बचत गटाचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. यामाध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत असते. परंतू या गटांना स्थायी स्वरूपाचे व्यासपीठ नव्हते. आ.भोयर यांनीच बचत गटाच्या महिलांना हक्काचे भवन मिळावे म्हणून प्रयत्न केले होेते. ते साकारत असल्याने राज्याला एक नवी देन मिळाली आहे, असे खा.तडस म्हणाले. साटोडा येथील सावित्रीबाई फुले महिला बचत गट भवनाचा लोकार्पण सोहळा खा.तडस, आमदार डॉ.भोयर व रामदासजी आंबटकर, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, वैशाली येरावार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
खा.तडस पुढे म्हणाले की शहरालगतच्या ग्रामपंचायतमध्ये विकासाचा मोठा अनुशेष होता. मात्र गत नऊ वर्षात विकासासाठी कोट्यावधीचा निधी मिळाल्याने ही गावे उजळून निघाली आहे. आमदार आंबडकर म्हणाले की वर्धा मतदारसंघाच्या विकासासाठी निधी आणतांनाच भाेयर यांनी शासकीय योजनांचा लाभ गरजवंतांना मिळवून दिला. बचत भवनाची निर्मिती ही महिलांच्या एकीचे फळ असल्याचे आ.डॉ.भाेयर म्हणाले. आज सालोड येथे एक कोटी रूपयाचे गोदाम तयार होत आहे. महिलांनी त्यांच्या उद्योगातील उत्पादन सुरक्षीत ठेवण्यासाठी या वस्तूचा लाभ घ्यावा. बचत गटांना नेहमी सहकार्य करू, असे डॉ.भायेर म्हणाले. सरपंच बादल विरूटकर, उपसरपंच प्रिती शिंदे, माजी सरपंच अजय जानवे, बचत गटाच्या अंजली कळमकर, अल्का खेडेकर, ज्योती मून, प्रिती करलुके प्रामुख्याने उपस्थित होते.