नागपूर: मुलाच्या उपचारासाठी एक गरीब विधवा महिला एका दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यात पायपीट करीत होती. जवळ पैसे पुरेसे नसल्याने उपचार होत नव्हता, कागदपत्रे नसल्याने मोफत उपचाराच्या योजनांचा लाभ मिळत नव्हता. ती हतबल झाली होती.अशा बिकट स्थितीत एक आमदार तिच्या मदतीला धावले.

ज्या महिलेवर हा प्रसंग गुदरला ती उमरेड तालुक्यातील उदासा या गावात पारधी बेड्यावर राहणारी. राखी पवार तिचे नाव. पतीचे काही वर्षांपूर्वीच निधन झालेले. मुलगी राशी, मुलगा मुकुल आणिआप्पा यांच्यासह ती रहात होती.रोजमजुरी करून घर चालवत होती. आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट.अशातच मुलगा मुकुल (२३) याला गंभीर आजाराने ग्रासले. उसनेवारी करून तिने त्याच्यावर सुरूवातीला उमरेड येथील रुग्णालयात उपचार केले. पण तेथेआराम पडेना. म्हणून ग्रामीण रुग्णालय गाठले. तेथील डॉक्टरांनी मुकुलला तात्काळ नागपूरमध्ये नेण्याचा सल्ला दिला.तिच्याकडे पैसे नव्हते. नातेवाईकांनी कसेबसे एक हजार रुपये गोळा करून दिले. ते घेऊन ती मुलासह नागपूरच्या शासकीय रुग्णालयात आली. तेथे डॉक्टरांनी मुकुलला तात्काळ अतिदक्षता विभागात हलवावे लागेल व त्यापूर्वी काही चाचण्या कराव्या लागतील, असे सांगितले. येथेही पुन्हा पैशाची अडचण आली. मुकुलकडे आधार कार्ड, मतदान कार्ड नसल्याने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून लाभही मिळाला नाही. त्यामुळे ती हतबल झाली.

हेही वाचा >>>चंद्रपूर : डॉ. अशोक जीवतोडे भाजपमध्ये प्रवेश करणार

नातेवाईकांनी तिला वानाडोंगरी येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटल ला जाण्याचा सल्ला दिला. ती तेथे पोहचली.डॉक्टरांनी तात्काळ अतिदक्षता विभागात नेले व उपचारासाठी येणारा खर्च सांगितला. पण तिच्याकडे पैसेच नव्हते, आणि त्याशिवाय डॉक्टर उपचार सुरू करीत नव्हते, ती हतबल झाली.काहीही करून मुलाला वाचवा असे ती डॉक्टरांना सांगू लागली. नातेवाईकांनी तिला स्थानिक आमदाराला संपर्क साधण्याचा सल्ला दिला. तिने त्यांच्याशी संपर्क साधून सर्व परिस्थिती सांगितली.मुलाला वाचवण्यासाठी मदत करा,अशी कळकळीची विनंती केली.आमदारांनी त्वरित रुग्णालयात फोन करून तिच्या मुलावर उपचार करण्यास सांगितले.

ते ’ माझ्यासाठी देव ठरले,अशी प्रतिक्रिया तिने दिली. कुठलीही ओळख नसताना केवळ सामाजिक बाधिलकीपोटी महिलेला तिच्या मुलाच्या उपचारासाठी केवळ एका फोनवर मदत करणारे आमदार होते समीर मेघे.

Story img Loader