लोकसत्ता टीम
यवतमाळ : पठाणी पेहराव, गळ्यात मफलर आणि हातात धारदार तलवार घेत पुसदचे आमदार इंद्रनील नाईक एका कार्यक्रमात सपत्नीक थिरकले. ही चित्रफीत समाज माध्यमांवर व्हायरल झाली असून, विरोधकांनी आमदार नाईक यांच्यावर टीका केली आहे. तर हातात तलवार घेऊन नाचल्याबद्दल पोलीस काय कारवाई करणार, असा प्रश्नही विरोधकांनी उपस्थित केला आहे.
पुसद विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे आमदार इंद्रनील नाईक हे माजी मंत्री मनोहर नाईक यांचे पुत्र आहेत. राजकारण करीत असताना आमदार इंद्रनील नाईक हे विविध कौटुंबिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमातही सहभागी होत असतात. त्यांच्या पत्नी मोहिनी या देखील पती इंद्रनील यांच्या पाउलावर पाऊल ठेवत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय झाल्या आहेत.
आणखी वाचा-आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल, तहसीलदारांनी न्याय देण्याऐवजी…
अशाच एका कौटुंबिक कार्यक्रमात पारंपरिक गीतावर आमदार इंद्रनील नाईक यांनी ठेका धरला. ते पाहून त्यांच्या पत्नीलाही इंद्रनील यांच्यासोबत नृत्य करण्याचा मोह आवरला नाही. इंद्रनील आणि त्यांच्या पत्नी मोहिनी यांना”अलमीडो अलमीडो घोडो, की बाघो घोडो अलमीडो” या पारंपरिक गीतावर थिरकताना पाहून त्यांच्या चाहत्यांनी या नृत्याचे चित्रीकरण केले. हा व्हिडिओ समाज माध्यमांनवर व्हायरल केला. तो व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. नाईक दाम्पत्याच्या नृत्याचे कौतुक नेटकरी करीत असले तरी हातात तलवार घेऊन नृत्य करत असल्याने टीकाही होत आहे. या संदर्भात आमदार इंद्रनील नाईक यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.