शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी नागपूर शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीबाबत एक किस्सा सांगितला. यानुसार शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी नागपूरमधील उमेदवारीवरून कपिल पाटील यांना फोन केला. तसेच आता काय करायचं असं विचारल्याचं कपिल पाटील यांनी सांगितलं. या संवादानंतरच शिवसेनेने आपला उमेदवार मागे घेतला. ते मंगळवारी (१७ जानेवारी) नागपूरमध्ये माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
कपिल पाटील म्हणाले, “संजय राऊत यांचा मला सोमवारी (१६ जानेवारी) कॉल आला होता. त्यांनी आता काय करायचं असं मला विचारलं होतं. मी त्यांना विनंती केली की, त्यांनी शिवसेनेचा उमेदवार मागे घेतला, तर राजेंद्र झाडे यांच्यासाठी ही लढत सोपी होईल. ते मला म्हणाले की, इतरांशी बोलून मी थोडा वेळाने तुम्हाला सांगतो.”
“संजय राऊत यांनी आम्ही शिवसेनेचा उमेदवार मागे घेतो असं सांगितलं”
“परत आमचा फोन झाला. तेव्हा संजय राऊत यांनी आम्ही शिवसेनेचा उमेदवार मागे घेतो असं सांगितलं. मी त्यांचे आभार मानले. आजही मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे आभार मानतो. त्यांनी नागपूर शिक्षक मतदारसंघातून त्यांचा उमेदवार मागे घेतला. त्यामुळे राजेंद्र झाडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे,” असं मत कपिल पाटील यांनी व्यक्त केलं.
“राजेंद्र झाडेंना काँग्रेसचा विरोध आहे का?”
राजेंद्र झाडेंना काँग्रेसचा विरोध आहे का? या प्रश्नावर कपिल पाटील म्हणाले, “सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी गेल्यावेळी राजेंद्र झाडे यांच्यासाठी शब्द दिला आहे. त्यामुळे तो शब्द आजही राजेंद्र झाडे यांच्याबरोबर आहे, याची मला खात्री आहे. काँग्रेसचे नेते कोणाबरोबर आहेत हे मला माहिती नाही. त्यामुळे त्यावर मी प्रतिक्रिया व्यक्त करणे बरोबर नाही. परंतु राजेंद्र झाडे यांचा विजय पक्का झाला आहे, हे यावेळी पहिल्यांदा दिसून आलं आहे.”
“शिवसेनेचा राजेंद्र झाडेंना पाठिंबा आहे का?”
शिवसेनेचा राजेंद्र झाडेंना पाठिंबा आहे का? असाही प्रश्न कपिल पाटलांना विचारण्यात आला. “नागपूर मतदारसंघात राजेंद्र झाडे एकमेव समर्थ आणि सक्षम उमेदवार आहेत. त्यांना शिक्षकांचा मोठा पाठिंबा आहे. दोन्ही बाजूच्या आघाडीतील नेतेमंडळींना हे लक्षात आलं आहे. त्यामुळे त्यांनी येथून काढता पाय घेतला आहे,” असं मत पाटील यांनी व्यक्त केलं.
“राजकारण सभ्य आणि सुसंस्कृत असलं पाहिजे”
“जे कोणी पेन्शनच्या बाजुचे आहेत, १०० टक्के अनुदान द्यायला तयार आहे ते सर्व राजेंद्र झाडे यांच्याबरोबर येतील याची मला खात्री आहे. राजकारण हे सभ्य आणि सुसंस्कृत असलं पाहिजे आणि राजकारणात शब्दाला मोठी किंमत असते आणि लोक त्याची आठवण ठेवत असतात,” असंही कपिल पाटील यांनी नमूद केलं.