अकोले: आमदार डॉ किरण लहामटे यांनी काल घाटघर येथील शासकीय आश्रम शाळेत भेट देत तेथेच मुक्काम केला.विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या संकल्पनेतून काल सात फेब्रुवारी रोजी ‘संवाद चिमुकल्यांशी’ हे अभियान राबविण्यात आले.राज्यात आदिवासी विकास विभागाचा ४९७ आश्रम शाळा आहेत.या अभियानांतर्गत मंत्री,आमदार,सचिव,अधिकारी आश्रम शाळेस भेट देऊन तेथेच मुक्काम करायचा होता.
आमदार डॉ.लहामटे यांनी तालुक्याच्या पश्चिम टोकाला कोकण कड्या नजिक असणाऱ्या घाटघर येथील आश्रम शाळेत मुक्काम केला .आपल्या भेटीत त्यांनी आश्रम शाळेत असणाऱ्या सुविधांची पहाणी केली.विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांबरोबर पंगतीत बसत जेवणाचा आस्वाद घेतला.
आश्रम शाळेच्या दर्जेदार इमारतीच्या बरोबरच आश्रम शाळा शैक्षणिक गुणवत्तेने परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करून आश्रम शाळेबद्दल असलेला विश्वास अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.दुसऱ्या दिवशी भंडारदरा पाणलोट क्षेत्रातीलच मूतखेल येथील आश्रम शाळेसही त्यांनी भेट देत विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला.