चंद्रपूर : पोलीस शिपाई दिलीप चव्हाण हत्या प्रकरणाचे सोमवारी विधानसभेत पडसाद उमटले. गुन्हेगारांचा हात आता पोलिसांपर्यंत पोहचला आहे. जिल्ह्यातील वाढलेली गुंडगिरी व गुन्हेगारी पाहता पोलीस दलात महत्त्वपूर्ण बदल करावे, अशी मागणी भाजप आमदार किशाेर जोरगेवार व काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
जिल्ह्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. राजकीय नेते व पोलिसांच्या आशीर्वादाने हे गुन्हेगार कोळसा, वाळू, मद्य, सट्टा, ऑनलाइन क्रिकेट सट्टा, तंबाखू, गुटखा, अंमली पदार्थ, फ्लाय ॲश, तथा इतर अवैध तस्करीत सक्रिय आहेत. जिल्ह्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. राजकीय नेते व पोलिसांच्या आशीर्वादाने हे गुन्हेगार कोळसा, वाळू, मद्य, सट्टा, ऑनलाइन क्रिकेट सट्टा, तंबाखू, गुटखा, अंमली पदार्थ, फ्लाय ॲश, तथा इतर अवैध तस्करीत सक्रिय आहेत. सर्वच राजकीय पक्षांच्या दुसऱ्या फळीतील युवा नेते याच व्यवसायात गुंतलेले आहेत. त्यांना पोलिसांची मदत आहे. नशेच्या आहारी गेलेला तरुण आता पोलिसांवर हात उगारायला लागला आहे. यातूनच पोलीस शिपाई चव्हाण यांची हत्या झाली. हत्या करणारे तिन्ही आरोपी नशेत होते. आरोपींना कठोर शिक्षा करावी आणि जिल्हा पोलीस दलात फेरबदल करावे, अशी मागणी आमदार जोरगेवार यांनी केली.
घुग्घुस शहर काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांच्यावर गोळीबार झाल्याचा मुद्दा आमदार वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. जिल्हा गुन्हेगारांचे माहेरघर झाला आहे. दारूबंदीच्या काळात असामाजिक तत्त्व या व्यवसायात उतरले आणि त्यांनी यातून बक्कळ पैसा कमावला. आता हे सर्व अन्य अवैध व्यवसायात सक्रिय झाले आहेत. या गुन्हेगार व गुंडांना वठणीवर आणा, अशी मागणी त्यांनी केली.
‘पोलीस अधीक्षक, अति. पोलीस अधीक्षकांची बदली करा’
जोरगेवार व वडेट्टीवार यांनी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अति. पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या बदलीची मागणी विधानसभेत केली. पोलिसांच्या आशीर्वादानेच हे सर्व सुरू असल्याचा आरोप जोरगेवार यांनी केला. राजकीय नेत्यांचे हस्तकही या अवैध व्यवसायांत सक्रिय आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मनसे यांसह इतरही छोट्यामोठ्या पक्षांतील दुसऱ्या फळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते कोणता व्यवसाय करतात, त्यांच्याकडे पद मिळाल्याबरोबर महागड्या चार चाकी गाड्या कशा येतात, असा यानिमित्ताने उपस्थित होत आहे.