आमदाराची माय यात्रेत बांबूच्या टोपल्या विकते असे सांगितले तर सर्वांना आश्चर्य वाटेल. पण, हे खरे असून चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेावर यांच्या आई वयाच्या ८० व्या वर्षीसुद्धा त्या चंद्रपूरच्या देवी महाकाली यात्रेत बांबूपासून बनवलेल्या टोपल्या आणि इतर वस्तू विकतात. विशेष म्हणजे, पोरगा आमदार झाला तरी, माय मात्र ८० व्या वर्षी व्यवसायाशी एकनिष्ठ राहत बांबूपासून बनवलेल्या टोपल्या विकण्याचा व्यवसाय करीत आहे.
आमदार किशोर जोरगेवार हे बुरड समाजाचे असल्याने त्यांच्या मातोश्री गंगूबाई ऊर्फ अम्मा जोरगेवार या बांबूपासून तयार केलेल्या टोपल्या व ताटवे विकायच्या. मागील ५० वर्षांपासून बांबूपासून बनवलेल्या ताटवे-टोपल्या विकत आहेत.
दरवर्षी त्या माता महाकाली यात्रेत आलेल्या यात्रेकरूंना टोपल्या, सुप व बांबूपासून बनवलेले साहित्य विकतात. यावर्षी देखील अम्माने देवी महाकाली यात्रेत थेट फुटपाथवर आपला बांबू टोपली विकण्याचा व्यवसाय थाटला आहे. माता महाकालीच्या दर्शनासाठी श्रद्धेने आलेल्या भाविकांना चंद्रपूरच्या बांबूच्या टोपल्या देण्यात त्या आनंद शोधत आहेत. वयाची ८० वर्षे पूर्ण झाली असल्याने वार्धक्यात घरी आराम करण्याचा सल्ला आमदार मुलगा अम्माला देतो. मात्र, अम्मा आमदार मुलाचेसुद्धा काहीएक न ऐकता त्या दरवर्षी त्या यात्रेत बांबूच्या टोपल्या विकण्यासाठी धडपडत असतात. मुलगा आमदार झाला तरी अम्मांची व्यावसायिक धडपड कमी झालेली नाही. कष्टाने समाधान मिळत आहे त्यामुळे मला टोपल्या विकण्याचा आनंदच आहे. त्यात लाजायचं काय अशी प्रतिक्रिया गंगूबाई जोरगेवार यांनी दिली. बांबू ताटवे, टोपल्या यांचा पिढीजात धंदा करणारे जोरगेवार कुटुंब आजही आपल्या व्यवसायावर ठाम आहेत.
आपल्या आईला व्यवसायाच्या ठिकाणी आमदार किशोर जोरगेवार गाडीतून रोज सोडतात. टोपल्या विकायचा परंपरागत व्यवसाय आहे. पिढीजात व्यवसाय आई करतेय. आमदार असलो तरी परंपरागत व्यवसाय करण्यासाठी लाजायचं काय? टोपल्या विकून तिला काम केल्याचं जे समाधान मिळतं हे जगातल्या इतर कोणत्याही गोष्टीतून मिळणाऱ्या आनंदापेक्षा जास्त आहे. आमचा व्यवसाय आहे तो केलाच पाहिजे, असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.