चंद्रपूर : सत्ता स्थापन करताना आमदारांसाठी विमान पाठवता, आता अधिवेशनात चंद्रपूर जिल्ह्याचे महत्त्वाचे प्रश्न मांडताना बेल वाजवता, ‘ये ना चालबे,’ असा चिमटा अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्यातील भाजप-शिवसेना (शिंदे गट) सरकारला काढला. यापुढेही तुम्हाला मत पाहिजे असल्यास तुम्हीच सर्वात पहिले विमान पाठवणार, असेही जोरगेवार म्हणाले. जोरगेवार यांच्या या विधानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर हिवाळी अधिवेशनात चंद्रपूर जिल्ह्यातील विविध मुद्यावर चर्चा करताना आ. जोरगेवार यांनी अनेक समस्या मांडल्या. दारूबंदी असताना जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यावेळी चंद्रपूर जिल्हा गुन्हेगारीत जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानी होता की काय, अशी स्थिती होती. ब्राऊन शुगर, एम.डी. अशा नशेचे आहारी तरुण वर्ग केला. अमली पदार्थांचे सेवन, तस्करी वाढली. भद्रावती तालुक्यातील बरांज खाणीतून संघटित पद्धतीने कोळसा तस्करी सुरू झाली.

हेही वाचा: नागपूर: समृद्धीवर अतिवेगात वाहन चालवल्यास ३० मिनिटे सक्तीचे समुपदेशन; पेट्रोलिंगसाठी मिळणार १० वाहने

आज या जिल्ह्यात कोळसा तस्करीने उग्र रूप धारण केले आहे. गोंडवाना विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील हुशार विद्यार्थी तयार नाहीत. सुमारे १५ हजार विद्यार्थी मुंबई, पुणे या शहरात शिक्षण घेत आहे. चंद्रपूर जिल्हा हा कधीकाळी औद्योगिक जिल्हा म्हणून सर्वदूर परिचित होता. मात्र आता या जिल्ह्याची अवस्था बकाल झाली आहे, असे आ. जोरगेवार म्हणाले. दरम्यान, ते बोलत असताना सभापतींनी बेल वाजवून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. यावर, सत्ता स्थापन करताना आमदारांसाठी विमान पाठवता आणि आता अधिवेशनात चंद्रपूर जिल्ह्याचे महत्त्वाचे प्रश्न मांडताना बेल वाजवता, ‘ये ना चालबे,’ असा चिमटा आ. जोरगेवार यांनी सरकारला काढला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla kishore jorgewar questioned that plane sent during formation government why not discussing important issues chandrapur rsj 74 tmb 01