नागपूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या नावाने नागपुरातील आमदार कृण्णा खोपडे यांनाही मंत्रिपदाचे आमिष दाखवून दिल्लीतून एका व्यक्तीने पैशांची मागणी केली.
कैलाश शर्मा असे खोपडे यांना पैसे मागणाऱ्या त्या तथाकथित भाजपा पदाधिकाऱ्याचे नाव आहे. आमदार विकास कुंभारे आणि टेकचंद सावरकर यांनाही मंत्रिपदाचे आमिष दाखवून पैशांची मागणी केल्याचा प्रकार समोर अला होता. आता खोपडेंना पैसे मागितल्याची माहिती समोर आली आहे.
खोपडे हे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असताना चार ते पाच महिन्यांपूर्वी कैलाश शर्मा नावाच्या व्यक्तीचा दिल्लीहून फोन आला होता. ‘भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मंत्रिपदासाठी तुमच्या नावाला स्वीकृती दिली असून तुम्ही लवकरच मंत्री बनणार आहात.’ असे शर्मा म्हणाला होता. दिल्लीतून ज्या सूचना येतील त्यांचे पालन करावे लागेल, असे सूचक वक्तव्यदेखील त्याने केल्याचे खोपडे यांनी सांगितले. मात्र, त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.
हेही वाचा – अमरावती : मुलाने केली दारूड्या पित्याची हत्या
शर्मा याचा तीन ते चार वेळेस फोन आला. मात्र, मी त्याला अपेक्षित प्रतिसाद न दिल्याने त्याने नंतर फोन करणे बंद केले. मी आमदार विकास कुंभारे व नीरजसिंह राठोड यांच्यातील संवादाची ध्वनिफीत ऐकली. त्यातील नीरज राठोड याचा आवाज मला फोन करणाऱ्या कैलाश शर्मापेक्षा वेगळा होता, असा दावा खोपडे यांनी केला आहे. खोपडे यांच्या या दाव्यामुळे आणखी एक टोळी उघडकीस येण्याची शक्यता आहे. खोपडे यांच्या दाव्यानुसार पोलिसांना नव्याने गुन्हा दाखल करावा लागणार असून, भाजपाचा तोतया पदाधिकारी कैलाश शर्मा याचाही शोध घ्यावा लागणार आहे.