बुलढाणा: राज्यातील महायुती सरकारने विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. लाडकी बहीण सारख्या उपयुक्त योजना आणि आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमाने सर्व जाती धर्मांना न्याय देण्याचे काम केले आहे. यामुळे युती सरकारला प्रचंड लोकप्रियता मिळाल्याने महाविकास आघाडीला आपला पराभव स्पष्टपणे दिसत असल्याने पराभूत मानसिकतेतून ते वाट्टेल ते आरोप करीत आहे. चिखली ( जि. बुलढाणा) विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत घोळ झाल्याचा आरोप याचेच द्योतक आहे, अशाआक्रमक भाषेत चिखलीच्या आमदार श्वेता महाले (भाजपा) यांनी महाविकास आघाडीला प्रत्युत्तर दिले.

चिखली विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत ऑन लाईन पद्धतीने विशिष्ट मतदारांची नावे वगळण्यात आली, त्यांची संमती न घेता हा घोळ करण्यात आल्याची तक्रार चिखलीचे माजी आमदार आणि संभाव्य उमेदवार राहुल बोन्द्रे यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्याकडे केली .त्यानंतर काल शुक्रवारी , १८ ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केली. यावर वरील शब्दात प्रतिक्रिया देताना आमदार श्वेता महाले यांनी आघाडीवर टीकास्त्र सोडले या कथित मतदार यादी घोळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव गोवण्याचा कोविलवाणा प्रयत्न म्हणजे केवळ ‘स्टंट बाजी’ असून यामुळे त्यांना फारतर प्रसिद्धी मिळेल, पण मतदान मात्र मिळणार नाही, असा टोला सुद्धा आमदार महाले यांनी आघाडी सह काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राहुल बोन्द्रे यांना लगावला आहे.’फडणवीसांचे नाव गोवणे केवळ स्टंटबाजीच’

हे ही वाचा…करोनापश्चात आजही थकवा, अशक्तपणा; अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. पंडित म्हणतात…

त्यामुळे महाविकास आघाडी पराभवाच्या छायेखाली आहे. ते मनाने आत्ताच पराभूत झाले आहेत. या मानसिक धक्क्यातून सावरता येत नसल्याने ते काहीही बेताल आरोप करतात.मात्र सत्य समोर आल्यावर तोंडावर पडतात, हा रडीचा डाव आहे असे परखड प्रत्युत्तर आ. श्वेताताई महाले यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना दिले आहे. चिखली विधानसभा मतदारसंघातली महाविकास आघाडीच्या मतदारांची नावे मतदार यादीतून गहाळ झाल्याचा आरोप करीत त्याला उपमुख्यमंत्री कार्यालय जबाबदार असल्याचा आरोप माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केला होता, त्यानंतर मुंबईत महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील याचा पुनरुच्चार केला होता त्यावर आमदार महाले यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. चिखलीत गेल्या काही दिवसांपासून स्टंटबाजी सुरू आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री कार्यालयाचे नाव घेण्यात येत आहे, मात्र स्टंटबाजी करून प्रसिध्दी मिळवता येईल मात्र मतदान नाही असा हल्लाबोल देखील आमदार महाले यांनी केला आहे.

पराभूत मानसिकतेमुळे असल्या उचापत्या करण्याची त्यांची ( राहुल बोन्द्रे यांची) जुनी सवय आहे असेही त्या म्हणाल्या.महाविकास आघाडीच्या मतदारांची नावे यादीतून गायब करण्यात आल्याचा आरोप खोटा आहे. त्यातल्या त्यात यात उपमुख्यमंत्री कार्यालयाचे नाव घेणे हे पराभूत मानसिकतेचे लक्षण आहे. त्यांनी जी दोन नावे गायब झाल्याचे सांगितले ती सौ .गाडेकर आणि सपकाळ ही दोन्ही नावे यादीत आहेत. मी स्वतः तहसीलदार आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून त्याबद्दलची माहिती घेतली आहे असे आमदार श्वेताताई म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीत ‘फेक नेरेटीव्ह सेट’ केल्यामुळे महाविकास आघाडीला जे काही थोडेफार यश मिळाले त्यामुळे त्यांच्याकडून पुन्हा एकदा संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.मात्र जनता हुशार आहे,जनतेला सगळ काही कळत.याचे उत्तर मतदानातूच जनता देईल असेही आमदार महाले म्हणाल्या आरोप चुकीचे, मतदार नोंदणीसाठी पुढाकार.

हे ही वाचा…दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या दराने सर्व विक्रम मोडले; हे आहेत आजचे दर…

मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. या देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे १०० टक्के मतदान व्हावे, मतदान नोंदणी व्हावी यासाठी आम्ही कायमच आग्रह धरला आहे. चिखली विधानसभा मतदारसंघात आम्ही नवमतदारांच्या नोंदणीचे काम केले. त्यावेळी कोणताही भेदभाव आम्ही केला नाही..कोण कोणत्या पक्षाचा मतदार आहे याचा विचार नोंदणी करून घेतांना केला नाही.आम्ही राष्ट्रीय कार्यासाठी पुढाकार घेतला असेही आमदारांनी सांगितले.