भंडारा : मला मंत्रिपद देत नसाल तर भाजप किंवा शिवसेनेच्या एखाद्या कार्यकर्त्याला मंत्रिपद द्या. मात्र, बाहेरचा पालकमंत्री दिल्यास त्याला १०० टक्के विरोध असेल, असा इशारा भंडाऱ्यातील शिंदे गटाचे समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिंदे – फडणवीस सरकारला दिला आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराचा आता निर्णय घ्यायलाच पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली.
राज्यातील शिंदे – फडणवीस यांचे सरकार येवून आता वर्षभराचा कालावधी झाला असला तरी, मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. याबाबत भंडाऱ्याचे शिंदे गटाचे समर्थक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सरकारला इशाराच दिला आहे. जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर, जिल्ह्याचा पालकमंत्री असायला हवा. मला जर मंत्रिपद देत नसाल तर, भाजप किंवा शिवसेनेच्या एखाद्या कार्यकर्त्याला मंत्रिपद द्या. अन्य जिल्ह्याला ज्या पद्धतीने स्थानिक पालकमंत्री देता, त्या पद्धतीने भंडारा जिल्ह्यालाही मिळायला हवा अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>>अमरावती: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फेकला विभागीय आयुक्तालयात कापूस
आता मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायलाच पहिजे, ही माझीच नाही तर, सर्व आमदारांची भावना आहे. वर्षभरापासून केवळ २० मंत्र्यांवरच राज्याचा कारभार चालला असून आता संपूर्ण मंत्रिमंडळ व्हायला पाहिजे. मात्र, भंडारा जिल्ह्यावर अन्याय होता कामा नये, बाहेरच्या जिल्ह्यातील मंत्र्यांना भंडाऱ्याचा पालकमंत्री बनवल्याने जिल्ह्याचा विकास खुंटतो. त्यामुळे स्थानिकांना लोकप्रतिनिधी किंवा कार्यकर्ते यांचा विचार व्हावा अशी भावना अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केली.