भंडारा : महाविकास आघाडीचे तत्त्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरूद्ध एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. या बंडात शिवसेनेसह काही अपक्ष आमदारांनी शिंदेंना पाठिंबा दिला. त्यात भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचाही समावेश आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडून शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांना नोटीस बजावण्यात आली होती. आज आमदार भोंडेकर त्यांचे म्हणणे विधान सभा अध्यक्षापुढे मांडतील. मात्र अपात्रतेची नोटीस मिळाल्यानंतर आता आमदार भोंडेकर यांची आमदारकी जाणार का ? असा चर्चेला उधाण आले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या निर्णय प्रक्रियेला आजपासून १४ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या प्रकरणाचा निकाल केवळ राज्यासाठीच नव्हे तर देशाच्या राजकारणातही महत्त्वाचा ठरणार आहे. शिवसेना कुणाची हा वाद निवडणूक आयोगात पोहोचल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. परंतु त्यापूर्वी आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडून कार्यवाहीला सुरूवात झाली आहे. आमदार अपात्रतेच्या या प्रक्रियेत अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह माजी मंत्री बच्चू कडू, माजी मंत्री राजेंद्र यड्रावकर या अपक्ष आमदारांनाही अपात्रतेची नोटीस पाठविली आहे. आज अपात्रतेची नोटीस मिळालेले सर्व आमदार मुंबई येथे सुनावणीसाठी उपस्थित राहून म्हणणे मांडत आहेत.६ सप्टेंबरला विधिमंडळाकडून अशी नोटीस पाठवून आज १४ सप्टेंबरच्या सुनावणीला हजर राहण्यासाठी सांगण्यात आले. आ. भोंडेकर यांनी २००९ मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढली होती. २०१९ ची निवडणूक अपक्ष लढून जिंकले होते. त्यानंतर त्यांनी शिंदे गटाला समर्थन दिले होते.
हेही वाचा >>>बैलजोडीचे पूजन करून ओबीसींचे आंदोलन; विविध संघटनांचा वाढता पाठिंबा
नोटीसीला उत्तर देऊ
२०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी नाकारली. त्यामुळे ही निवडणूक अपक्ष लढलो. मतदार क्षेत्रातील जनतेने विश्वास दाखवित बहुमताने निवडून दिले. जनतेची कामे आणि मतदारसंघाच्या विकासासाठी निधी मिळावा यासाठी त्यांना साथ दिली होती. परंतु, भ्रमनिरास झाला. आता एकनाथ शिंदे सरकारमध्ये भंडारा क्षेत्रात निधीची कमतरता नाही. कोट्यवधीच्या निधीतून कामे सुरू आहेत. अपक्ष आमदारांना नोटीस देण्यामागील कारण कळले नाही. तरीही आज नोटीसीला उत्तर देण्यात येईल.- नरेंद्र भोंडेकर, आमदार भंडारा.