भंडारा : ‘टू बी ऑर नॉट टू बी’ हा प्रश्न जसा ‘नटसम्राट’ अप्पासाहेब बेलवलकरांना पडला होता तसाच तो आता भंडाऱ्याचे शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना देखील पडला आहे. मतदारसंघातील विकास कामांसाठी ३००० कोटींचा निधी मंजूर केल्याचा गाजावाजा करीत ते स्वयंघोषित ‘कार्यसम्राट’ बनले. मात्र मंत्रिपदाचा फाजील आत्मविश्वास असलेल्या भोंडेकरांचा भ्रमनिरास झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या संघटनात्मक पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेची नाराजी ओढवून घेतली असून मंजूर झालेला हा निधी आता जिल्ह्याला मिळणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मंत्रिपद हुकल्यानंतर भोंडेकर यांच्या नाराजी नाट्यामुळे भंडाऱ्याचे ‘कार्यसम्राट’ आता ‘नटसम्राट ‘ झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

नरेंद्र भोंडेकर हे २००९ ( शिवसेना) आणि २०१९ (अपक्ष) मध्ये भंडारा विधानसभेचे आमदार राहिलेले आहेत. २०२४ मध्ये तिसऱ्यांदा आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असताना देखील त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र त्यावेळीही त्यांचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळेच शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर भोंडेकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर नरेंद्र भोंडेकर यांनी शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला. या निवडणुकीत त्यांचा प्रचार करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः भंडारा जिल्ह्यामध्ये आले होते. विशेष म्हणजे पवनी येथील जाहीर सभेत एकनाथ शिंदे बोलत असताना भोंडेकर यांनी शिंदे त्यांच्याकडून स्वतःला ‘भावी पालकमंत्री’ असे वदवून घेतले होते. आता तोच धागा पकडून एकनाथ शिंदे यांनी शब्द पाळला नसल्याचा बोभाटा भोंडेकर करीत आहेत. मात्र शिंदे यांनी स्वतःहून तशी घोषणा केलेली नव्हती ते केवळ भोंडेकर यांच्या सांगण्यावरून तसे बोलल्याचे आता स्पष्ट झाले आहे. निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नरेंद्र भोंडेकर यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. शपथविधीपूर्वी अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी वाट पाहिली. मात्र यावेळीही त्यांचा भ्रमनिरास झाला. अखेर त्यांनी नाराजी व्यक्त करत शिवसेनेच्या संघटनात्मक पदांचा राजीनामा एकनाथ शिंदे यांना पाठवला.

हेही वाचा – “मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पण, आज विस्तारापेक्षा वजाबाकीची चर्चा”; उद्धव ठाकरेंनी मर्मावरच…

नरेंद भोंडेकर हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असल्याने शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी भंडारा पवनी मतदारसंघासाठी सढळ हाताने निधी मंजूर केला. मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी सुमारे ३००० कोटींचा निधी मंजूर केल्याचा गवगवा भोंडेकर यांनी केला. मात्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेतेपद आणि पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिल्यामुळे साहजिकच एकनाथ शिंदे यांची नाराजी त्यांनी ओढवून घेतली आहे. त्यातच शिंदे आता मुख्यमंत्रीसुद्धा नाहीत त्यामुळे जिल्ह्यासाठी मंजूर झालेला कोट्यवधींचा निधी जिल्ह्याला मिळणार का? की भोंडेकर यांच्या स्वार्थापायी जिल्ह्यावर पुन्हा एकदा अन्याय होणार? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपद न मिळालेल्या नेत्यांना ‘श्रद्धा आणि सबुरी’ राखण्याचा सल्ला दिला आहे. जे सबुरी ठेवतील त्यांना भविष्यात नक्कीच फायदा होईल असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे. मात्र आमदार भोंडेकर यांची एकनाथ शिंदे यांच्यावरची ‘श्रद्धा’ आता कमी झाली असून त्यांनी सबुरी न राखल्यामुळे शिंदेही त्यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे कधीकाळी उद्धव ठाकरेंवर टीका करणारे भोंडेकर मंत्रिपद मिळाले नाही म्हणून आता एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका करू लागले आहे. शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यानंतरही त्यांनी ‘मला महाविकास आघाडीकडूनही ऑफर होती’ असा गौप्यस्फोट केला होता. एवढेच नाही तर नुकतेच त्यांनी ‘फडणवीस यांचा प्रस्ताव स्वीकारला असता तर बरे झाले असते’ अशी खदखदही उघडपणे व्यक्त केली आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी अती महत्त्वाकांक्षी असलेले भोंडेकर आता शिंदेसोबत राहतात की फडणवीसांचा हात धरतात हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

हेही वाचा – Sudhir Mungantiwar : “मी नाराज नाही, आमदार म्हणून जनतेचे प्रश्न मांडणार,” सुधीर मुनगंटीवार यांची स्पष्टोक्ती…

कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी…

मंत्रिपदासाठी थयथयाट करणारे भोंडेकर सरकारवर दबाव आणण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून ‘जिल्ह्याचा हक्काचा पालकमंत्री’ अशी बॅनरबाजी करीत आहेत.

Story img Loader