भंडारा : मंत्रिपदाचा दिलेला शब्द पूर्ण न केल्याने नाराज होत भंडारा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. पक्षात मागून आलेल्यांना न्याय मिळतो, परंतु आम्हाला नाही. भाजप प्रवेशाचा आग्रह असताना आम्ही शिवसेनेत आलो, त्याचा आता पश्चाताप झाल्यासारखे वाटते असे विधान आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंत्रिपद न मिळाल्याने नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेतापदाचा राजीनामा दिला आहे. ते म्हणाले की, मागच्या अडीच वर्षांपूर्वी १० अपक्ष आमदारांमध्ये सगळ्यात आधी मी एकनाथ शिंदेंसोबत गेलो. कुठलाही स्वार्थ न ठेवता मी गेलो तेव्हा मला शब्द दिला होता. नक्कीच सरकार आपले येणार आहे, तुम्हाला सन्मानाने मंत्रिपद देऊ परंतु मंत्रिपद दिले नाही. मात्र मंत्रिपद न मिळताही सोबत राहिलो, आमचा उद्देश सेना-भाजपा सरकार राहिले पाहिजे, असा होता. अडीच वर्षांनंतर जेव्हा पक्षप्रवेशाची वेळ आली. तेव्हा चर्चा झाली, मागे मंत्रिपद नाही, महामंडळही दिले नाही परंतु आता नव्या सरकारमध्ये तुम्हाला मंत्री बनवू असं सांगितले. आमच्यात बोलणे झाले तेव्हाही शब्द दिला आणि जाहीरसभेतही बोलून दाखवले.

हेही वाचा – बुलढाणा : सहा दशकांत मोजक्या नेत्यांनाच ‘लाल दिवा! आकाश फुंडकर दिग्गजांच्या यादीत

तसेच एवढे झाल्यानंतर आज जे मागून आलेत, त्यांना मंत्रिपदे दिली. जे पक्षासोबत प्रामाणिक राहत नाही. इकडे तिकडे जातात त्यांना मंत्रिपद दिले मग मी पदावर राहून करू काय? शिवसेनेत नेता, उपनेता हे मोठे पद असते. ६ जिल्ह्यांचे समन्वयक पद आहे. परंतु कुठलीही चर्चा नाही. कुठलीही विचारपूस नाही. कुठलीही संधी नाही. भविष्यात अनेक गोष्टी आहेत ज्या माझ्या मनात आहेत त्या मी आज सांगू शकत नाही. मी शिवसैनिक आहे आणि राहीन परंतु जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर मी फक्त माझ्या जिल्ह्यातील लोकांसाठी थांबलो आहे नाहीतर आमदारकीचाही राजीनामा दिला असता. आमचा जिल्हा कधीपर्यंत बाहेरच्या पालकमंत्र्यावर अवलंबून राहील, जिल्ह्याचा पालकमंत्री असता तर नक्कीच विकास झाला असता. त्यासाठीच आम्ही पक्षप्रवेशाचा कार्यक्रम केला परंतु आज पुन्हा पालकमंत्री मिळणार नाही, अशी खंत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी बोलून दाखवली.

दरम्यान, मला भाजपातील पक्षप्रवेशासाठी देवेंद्र फडणवीसांचा आग्रह होता. मलाही ते नेते म्हणून आवडतात. परंतु माझ्यावर पक्षांतराचा डाग लागू नये म्हणून मी शिवसेनेत जाण्याचा विचार केला. मात्र आता पश्चातापाची वेळ आल्यासारखे वाटते. इथं शिवसेना काहीच नाही, आम्ही आमच्या ताकदीवर आहोत. या सगळ्या गोष्टींवर भविष्यात मी बोलेल असा इशाराही आमदार भोंडेकरांनी दिला.

हेही वाचा – मंत्रिपद नाकारले; भुजबळ समर्थक रस्त्यावर, कुटे समर्थकांचा समाजमाध्यमावर निषेध

प्रामाणिकतेला किंमत नाही…

एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहून आम्ही पक्षात प्रवेश केला होता. शिंदेंनी विश्वासात घ्यायला पाहिजे होते. एवढे मोठे पक्षाचे उपनेतेपद दिले पण त्याचा काही अर्थ आहे का? कुठेही विचारात न घेता मागून आलेल्याला तुम्ही मंत्रिपद देता हे दुःख वाटण्यासारखेच आहे. प्रामाणिकतेला काही अर्थ नाही, हे दिसून येते, अशी उघड नाराजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla narendra bhondekar bhandara unhappy with eknath shinde what did he say about devendra fadnavis ksn 82 ssb