कविता नागापुरे
भंडारा : जिल्ह्यातील स्थानिक नेतृत्वालाच पालकमंत्री पद देण्यात यावे, बाहेरचा पालकमंत्री दिल्यास त्याला १०० टक्के विरोध करू असा खणखणीत इशारा अगदी महिना भरापुर्वीच भंडाऱ्यातील शिंदे गटाचे समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला होता. त्यांच्या समर्थकांकडून ‘भावी पालकमंत्री’ म्हणून त्यांचे बॅनरही लावण्यात आले होते. अर्थात आमदार भोंडेकर त्यांची पालकमंत्री पदाची आंतरिक इच्छा काही लपून राहिलेली नव्हतीच. मात्र आता महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपद मिळणे हे केवळ दिवास्वप्न असल्याचे लक्षात येताच ‘उम्मिद पे दुनिया कायम है’ म्हणत अखेर जड अंतःकरणाने आ. भोंडेकर यांनी मंत्रीपदाच्या इच्छेवर पाणी सोडले आहे.
नुकतीच प्रसारमाध्यमांवर त्यांनी त्यांची ही भूमिका स्पष्ट केली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना ‘मला मंत्रीपद दिले तरी चालेल, नाही दिले तरी चालेल, आज नाही भेटले तर उद्या भेटेल.. उम्मिद पे दुनिया कायम है ‘ असा मनाचा मोठेपणा आमदार भोंडेकर यांनी दाखविला असला तरी त्यांच्या बोलण्यात नाराजीचा सूर असल्याचे बोलले जात आहे. कारण तोंडाशी आलेला ‘मंत्रिपदाचा घास’ जाण्याची ही पहिली वेळ नसून या आधीही त्यांनी पाहिलेल्या मंत्रिपदाच्या स्वप्नांना ‘नाट’ लागली आहे.
हेही वाचा >>> सुषमा अंधारेंच्या विभक्त पतीला पाच कोटी रुपये नुकसान भरपाईची नोटीस
२०१९ मध्ये भंडारा विधानसभा क्षेत्रासाठी भाजप – सेना उमेदवाराच्या विरोधात आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविलीच नाही तर विजयाची माळ गळ्यात घालून घेतली. मात्र त्यावेळी ‘मी अपक्ष म्हणून जरी निवडणूक लढविली असली तरीही मी अजूनही शिवसेनेत’ असल्याचे भोंडेकर नेहमीच बोलत असतं. त्यामुळे त्यावेळीही महाविकास आघाडी सरकारमध्ये पक्षासोबत प्रामाणिक राहिल्याची परतफेड म्हणून मंत्रिपद मिळेल, अशी भोळी आशा भोंडेकर उराशी बाळगून होते. मात्र तेव्हाही त्यांचा हिरमोड झाला होता. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी तरीही उमेद सोडली नाही. त्यातच राज्यसभा निवडणुकीनंतर अपक्ष आमदारांचे महत्व वाढू लागले. त्यामुळे भंडाऱ्याचे अपक्ष आमदार भोंडेकरांना यांना पुन्हा ‘अच्छे दिन’ येऊ लागले.
हेही वाचा >>> “सरकार म्हणजे विषकन्येसारखं, ज्या प्रकल्पात हस्तक्षेप…”; नितीन गडकरींचं मोठं विधान
मधल्या काळात विधान परिषद निवडणुकीनंतर भोंडेकर यांना राज्यमंत्री दर्जाचे पद मिळणार असल्याच्या चर्चाही चांगल्याच रंगल्या. “अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांना राज्यमंत्री पदाची लॉटरी लागणार, भंडाऱ्यात मंत्र्याची गाडी पाहायला मिळणार, विदर्भ पाटबंधारे महामंडळ आ. भोंडेकर यांच्याकडेच” असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्येही सातत्याने झळकले. दुधाची तहान ताकावर भागवायची तयारी दाखवत ‘महामंडळच सही’ असे म्हणत त्यांनी राज्यमंत्री पदाची स्वप्ने रंगविण्यास सुरवात केली. राज्य मंत्रीपद भोंडेकर यांनाच मिळणार हे निश्चित असल्याचे भाकीतही वर्तविले गेले.
हेही वाचा >>> आता शिंदे गटावर घंटा वाजवण्याची वेळ आली, माजी मंत्री वडेट्टीवार यांची टीका
मात्र वर्ष लोटूनही त्यांच्या पदरी निराशाच येत होती. असे असतानाही शिंदे सरकारमुळे त्यांच्या आशा पल्लवित झालेल्या होत्या. कमालीचा आशावाद ठेवत त्यांनी पालकमंत्री पदाची स्वप्ने पहिली. पालक मंत्रीपद आपल्याच वाट्याला येणार असा त्यांचा अद्यम्य आत्मविश्वास होता. मात्र ‘नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न’ अशी भोंडेकरांची गत झाली. भाजप-सेना युतीत राष्ट्रवादीने उडी घेतली आणि भाजप-सेना-राष्ट्रवादी या महायुतीमुळे त्यांचे पालकमंत्री पदाचे स्वप्न पुन्हा धोक्यात आले. अखेर भोंडेकर यांनी मोठ्या मनाने पालकमंत्री पद मिळाले नाही तरी चालेल असे जाहीर करून टाकले.
मात्र पुढे बोलताना ‘पुढच्या वेळी विकास कामांसाठी निधी खेचून आणू ‘ या त्यांच्या वक्तव्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या एंट्रीनंतर महायुती सरकारमध्ये अपक्ष आमदाराला विकास कामासाठी निधी मिळविण्यात अडचणी येत आहेत की काय ? अशी चर्चाही या निमित्ताने आता रंगू लागली आहे. राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांचे पडसाद जिल्ह्यातल्या राजकारणावर पडले आहेत. विशेषतः जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदाराला या महायुतीचा फायदा होणार असून अपक्ष आमदाराचे ‘अच्छे दिन’ या महायुतीमुळे धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. त्याचे कारणही तसेच आहे.
भंडारा-पवनी या विधानसभा मतदार संघातील पवनी तालुका हा राष्ट्रवादीचा गड समजला जातो आणि या मतदार संघात भाजपचीच दावेदारी असते. शिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचार प्रमुख भाजपचे उमदेवार असणार हे स्पष्ट केल्यामुळे महायुतीत या मतदार संघात राष्ट्रवादी भाजपच्या उमेदवारालाच पाठिंबा देईल. तुमसर विधानसभा क्षेत्रावरील हक्क भाजप राष्ट्रवादीसाठी सोडेल असे राजकीय विश्लेषक सांगतात. आता महायुतीतील भाजप – सेना (शिंदे)- राष्ट्रवादी हे त्याच्या उमेदवारांना सोडून अपक्ष आमदाराला कशी साथ देतील हे भविष्यातील निवडणुकीतच स्पष्ट होईल.