खासदार भावना गवळी यांनी तक्रारीत केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. आपण आताही आणि नंतरही त्यांना गद्दारच म्हणू, अशा शब्दात आमदार नितीन देशमुख यांनी गवळींच्या तक्रारीचा समाचार घेतला. अकोल्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- अकोला रेल्वे स्थानकावर खासदार भावना गवळींविरोधात गद्दारच्या घोषणा; विनायक राऊत आणि नितीन देशमुखांवर गुन्हा दाखल

अकोला रेल्वेस्थानकावर मंगळवारी रात्री शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी व ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत ‘आमने-सामने’ आले होते. यावेळी शिवसैनिकांनी गवळींसमोर ‘गद्दार-गद्दार’ अशी घोषणाबाजी केली. या प्रकरणी गवळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून खासदार विनायक राऊत, आणि आमदार नितीन देशमुख यांच्यासह इतरांवर बुधवारी रात्री लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यासर्व प्रकरणा संदर्भात देशमुखांनी आपली बाजू मांडली. ते म्हणाले, गवळी यांनी तक्रारीत केलेले आरोप तथ्यहिन व बिनबुडाचे आहेत. कटकारस्थान रचून ही तक्रार केली आहे. अश्लील चाळे, जीवे मारण्याची धमकी अशा पद्धतीची तक्रार देणे खा.भावना गवळी यांना शोभत नाही. निश्चितपणे आम्ही त्यांना गद्दार म्हटले. यापुढे देखील त्यांना गद्दारच म्हणू, अशी भूमिका देशमुख यांनी मांडली.

हेही वाचा- राज्यातील विद्यापीठांमध्ये भाषा विभागांची दैनावस्था; पूर्णवेळ प्राध्यापकांचा अभाव; ‘यूजीसी’कडून मात्र ‘भाषा दिन’ साजरा करण्याचा आग्रह

मोदींचे छायाचित्र महागात पडले

२०१४ पासून निवडणुकीत नरेंद्र मोदींचे छायाचित्र वापरल्याने शिवसेनेचे नुकसानच झाले आहे. आधी शिवसेनेची अधिक ताकद होती. शिवसेनेच्या जास्त जागा निवडून येत होत्या. मात्र, मोदींचे छायाचित्र वापरल्याने शिवसेनेच्या जागांवर परिणाम झाला, असेही देशमुख म्हणाले.

शिंदे गटातील खासदार भाजपच्या चिन्हावर लढणार

विदर्भातील शिंदे गटाच्या खासदारांनी भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचा गौप्यस्फोट नितीन देशमुख यांनी केला. या संदर्भात त्या खासदारांची एक बैठक झाली, त्यात त्यांचे एकमत झाल्याचा दावा देशमुख यांनी केला. शिंदे गटात सहभागी झालेल्या खासदारांना पराभवाची चिंता आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर त्या खासदारांचा विश्वास नाही, असा टोला देखील देशमुखांनी लगावला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla nitin deshmukh on mp bhavna gawlis complaint for calling her a gaddar on akola railway station dpj