चंद्रपूर : सोयाबीन पिकावर विविध कीड व रोग अचानकपणे आल्यामुळे तीनच दिवसांत संपूर्ण सोयाबीन पीक पिवळे पडून मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या पिकांवर मूळखूज, खोडखूज आणि पिवळा मोझॅक या रोगांच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पिकाचे १०० टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे पीक हंगामात हंगामातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकाचे होणारे नुकसान या जोखमीच्या बाबीअंतर्गत सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट एक लाख प्रती हेक्टरी मदत जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा – ‘कॉमन क्रेन’च्या तस्करीचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत

आज आमदार प्रतिभा धानोरकर यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या चमूसोबत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांवर आलेले संकट मोठे आहे. या रोगामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खरीप पीक हातून गेले आहे. त्यामुळे तत्काळ शासनाने याकडे लक्ष देऊन पॅकेज जाहीर करण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.

आज जिल्हास्तरीय समितीमधील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार, कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाहीचे डॉ. विनोद नागदेवते, कृषी अधिकारी विनोद कोसनकर, ओरियंटल इन्शुरन्स कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी कारपेनवार व चौधरी यांनी वरोरा तालुक्यातील विविध महसूल मंडलमधील चारगाव (बु), चारगाव (खुर्द) व वरोरा मंडळअंतर्गत शेंबळ, या गावातील सोयाबीन नुकसानग्रस्त क्षेत्राला भेट देऊन पाहणी केली. या दौऱ्यामध्ये आमदार धानोरकर यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. या कठीण प्रसंगी लोकप्रतिनिधी व संपूर्ण कृषी विभाग आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले.

हेही वाचा – पश्चिम बंगाल, ओडिशाजवळ कमी दाबाचा पट्टा, राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात सोयाबीन पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पिकावर कीड व रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेले उत्पन्न हिरावल्या गेले आहे. खरीप हंगामातील पीक हातचे गेल्याने रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडले आहे. शेतकरी प्रचंड तणावाखाली आहे. संपूर्ण शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला नसून पीक विमा व्यतिरिक्त शासनाने या आलेल्या नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी नैसर्गिक आपत्ती नुकसान या बाबीअंतर्गत प्रती हेक्टरी एक लाखाची मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

संपूर्ण वरोरा तालुक्यासह ईतर तालुक्यांतील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यात मिड सिजन अडवर्सिटी तत्काळ लागू करून तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना केल्या. या दौऱ्यात मंडळ कृषी अधिकारी, शेगांव बु. विजय काळे, मंडळ कृषी अधिकारी घनश्याम पाटील, कृषी अधिकारी मारोती वरभे, उमाकांत झाडे, पंकज ठेंगणे, राजू चिकटे, योगेश वायदुळे, योगेश खामनकर, ईश्वर सोनेकर, संदीप थुल, बंडू शेळकी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla pratibha dhanorkar demands to give 1 lakh hectare assistance to soybean farmers rsj 74 ssb