चंद्रपूर: शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा थ्री फेज वीजपुरवठा करण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली होती. या मागणीला सरकार कडून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने शुक्रवार ३ नोव्हेंबर रोजी सकाळी वरोरा येथील राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर शेतकरी व पदाधिकारी तसेच कार्यकत्यांनी मोर्चा काढत अधिकाऱ्यांना खोलीत बंद करून कुलूप ठोकले.
त्यानंतर ठिय्या आंदोलन करून धानोरकर यांच्या नेतृत्वात सरकारचा निषेध केला. या आंदोलनानंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसात मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
हेही वाचा… मराठा आरक्षणासाठी अकोल्यात सलग सहा दिवस ‘अन्नत्याग’; अखेर उपोषण सोडताना म्हणाले, ‘आता…’
दरम्यान, आश्वासन पूर्ण न केल्यास चंद्रपूर कार्यालयाला कुलूप बंद आंदोलन करू, असा इशारा धानोरकर यांनी दिला. या आंदोलनात भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, वरोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर, शहर काँग्रेस अध्यक्ष विलास टिपले, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती विशाल बदखल, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती राजेंद्र चिकटे, भद्रावती काँग्रेस शहर अध्यक्ष सूरज गावंडे, माजी नगरसेवक राजू महाजन, वरोरा तालुका महिला अध्यक्ष ऐश्वर्या खामनकर, मोनू चिमुरकर, प्रमोद मगरे सहभागी झाले होते.