चंद्रपूर: राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली मृत्यू नंतर त्यांच्या पत्नी तथा वरोरा – भद्रावती विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दुःख बाजूला सारून राजकीय वर्तुळात सक्रिय झाल्या आहेत. काँग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधी व माजी खासदार राहुल गांधी यांच्या पाठोपाठ माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनबद्दल दुःख व्यक्त करता श्रीमती धानोरकर यांचे सांत्वन केले.
खासदार धानोरकर यांच्या अकाली मृत्यूला आता एक महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी झाला आहे. तरुण वयात पतीच्या अकाली मृत्युमुळे आमदार धानोरकर यांना जबर धक्का बसला. मात्र आता या धक्क्यातून आमदार प्रतिभा धानोरकर हळूहळू स्वतःला व कुटुंबाला सावरत राजकारणात सक्रिय होत आहेत. आता त्यांनी नेत्यांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले आहेत. दिल्ली येथे काँग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधी व माजी खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. तसेच माजी मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
हेही वाचा… भंडारा: पाय घसरल्याने शेततळ्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू
दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी शिवसेना शाखा प्रमुख पासून सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर २००९ मध्ये शिवसेनेनं त्यांना वरोरा – भद्रावती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली होती. तेव्हा त्यांचा अतिशय अल्प मतांनी प्रभाव झाला होता. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी माजी मंत्री दिवंगत संजय देवतळे यांचा प्रभाव केला. दरम्यान लोकसभा निवडणूक लढायची आहे, म्हणून धानोरकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केले होते. मात्र त्यानंतरही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संबंध कायम ठेवले होते.
हेही वाचा… ‘सामान बेचो’ आंदोलन करीत हाताला काम नसलेल्यांनी केला निषेध
आमदार प्रतिभा धानोरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घेतली तेव्हा या सर्व गोष्टीचा उलगडा झाला. यावेळी ठाकरे यांनी श्रीमती धानोरकर यांची आस्थेने चौकशी करीत झालेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त करून सर्वप्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले. यावेळी श्रीमती धानोरकर यांचे सोबत भद्रावतीचे शिवसेनेचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, शिवसेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख संदीप गीऱ्हे, शिवसेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे उपस्थित होते. दरम्यान दिल्लीत श्रीमती धानोरकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर अनेक नेत्यांची भेट घेतली.