लोकसत्ता टीम
चंद्रपूर : चेकबरांज व बरांज (मोकासा) या दोन्ही बाधित गावांचे पुनर्वसन लवकरात लवकर करावे या तथा अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी कर्नाटक एम्टा खाणीत काम बंद आंदोलन करून कोळसा वाहतूक रोखून धरली. दरम्यान, या आंदोलनामुळे एम्टा व्यवस्थापन नरमले व महत्वाच्या मागण्या तात्काळ मान्य करीत उर्वरीत मागण्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
आणखी वाचा-रविकांत तुपकरांची जामिनावर सुटका; म्हणाले, “सत्य परेशान हो सकता हैं पराजित नही”
कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या कोळसा खाणीमुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्त, कामगार व ग्रामस्थांच्या विविध समस्यां व मागण्यासाठी शनिवार २५ नोव्हेंबर रोजी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात कामबंद आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नाटक एम्टा खाणीतील माल वाहतूक बंद करण्यात आली. या आंदोलनात भद्रावती नगर परिषद नगराध्यक्ष अनील धानोरकर, कंपनी व्यवस्थापक गौरव उपाध्याय, भद्रावती काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत काळे, भद्रावती काँग्रेस शहर अध्यक्ष सूरज गावंडे, वरोरा काँग्रेस तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर, वरोरा काँग्रेस शहर अध्यक्ष विलास टिपले, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती राजेंद्र चिकटे व प्रकल्प बाधित ग्रामस्थ हजारोच्या संख्येने सहभागी होते. आंदोलनाची दखल घेत व्यवस्थापकाने महत्वाच्या मागण्या तात्काळ मान्य करीत इतर मागण्या दोन महिन्याच्या आत पूर्ण करण्याचा शब्द दिला.