लोकसत्ता टीम
नागपूर : नागपूर शहर वसविणारे गोंडराजे बख्त बुलंदशहा यांच्या समाधीचे संवर्धन करण्यासाठी ९ कोटी ७२ लाखांचा आराखडा नागपूर सुधार प्रन्यासने राज्य शासनाकडे आहे, त्याला ९ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनही काम प्रलंबित आहे, याकडे भाजप आमदार प्रवीण दटके यांनी शासनाचे लक्ष वेधले.
या ठिकाणी अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण तत्काळ काढून आवश्यक तो निधी देण्याचे एनआयटी आणि महापालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी केली. सक्करधरा येथे असलेल्या या समाधी स्थळाचे कामाला गती मिळावी अशी मागणी आदिवासी समाज बांधवांकडून होत असल्याची माहिती दटके यांनी दिली.
नागपूर सुधार प्रन्यासकडे हे काम असून समाधीचे संवर्धन होऊन नागपूरचा इतिहास सर्वांना माहिती व्हावा यासाठी हा प्रकल्प पूर्णत्वास जाणे आवश्यक आहे अशी मागणी आमदार दटके यांनी केली. आजच या ठिकाणचे अतिक्रमण काढून निधी देण्याचे आदेश एनआयटी ला देत असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात सांगितले.