बुलढाणा : महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गालगत प्रस्तावित महानगर (स्मार्ट सिटी) उभारली जाणार की नाही याबद्दल प्रशासन व जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सिंदखेड राजाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी यासंदर्भात आज विधानसभेत प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले.
माजी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी आज २१ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान यावर प्रश्न विचारला. यावेळी आमदार म्हणाले की, ज्यावेळी नागपूर-मुंबई असा समृद्धी महामार्ग प्रस्तावित करण्यात आला, त्यावेळी महामार्गाच्या अनेक ‘इंटरचेंज’ जवळ नवनगर म्हणजेच स्मार्ट सिटी निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली होती. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील इंटरचेंजजवळ पाच किलोमीटर अंतर असलेल्या माळ सावरगाव, निमखेड व गोळेगाव ही तीन गावे मिळून हे नवनगर निर्माण होणार होते. यासाठी लागणारी भूसंपादनाची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली. मात्र हे काम सध्या थंडबस्त्यात पडले आहे.
हेही वाचा >>> जोपर्यंत जुनी पेन्शन मिळत नाही तोपर्यंत संप संपवणार नाही, गोंदियात संप सुरूच
गेल्या काही दिवसांपासून हे नवनगर होणार की नाही, याबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. अधिकारी व जनतेमध्ये देखील याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. नवनगर निर्माण झाल्यास याठिकाणी मोठमोठे उद्योग येऊन मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊ शकते. परिसरातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार मिळू शकतो. त्यामुळे खरच ही नवनगरे निर्माण होणार का? ही नवनगरे नेमकी कधी निर्माण होतील, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना शंभूराजे देसाई म्हणाले की, जी नवनगरे प्रस्तावित आहेत त्या प्रस्तावात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया देखील सुरू आहे. त्यामुळे ही नवनगरे होणारच आहेत.