बुलढाणा: मंगळवार पाठोपाठ जिल्हा राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा तथा आमदार राजेंद्र शिंगणे यांनी आज मूळ पक्षाकडून आयोजित बैठकीला हजेरी लावली. मलाही अजित दादां कडून ‘ऑफर’ होती असा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली.परिवारासह पर्यटनावर असलेले आमदार राजेंद्र शिंगणे यांनी काल मंगळवारी ‘सिल्वर ओक’ येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. आज पक्षातर्फे मुंबई स्थित यशवंतराव चव्हाण केंद्रात बैठक लावण्यात आली.
या बैठकीला आमदार शिंगणे यांचेसह प्रसेनजीत पाटील, पांडुरंगदादा पाटील,नरेश शेळके , संतोष रायपूरे, साहेबराव सरदार, सुमित सरदार , अनिल बावस्कर आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.यामुळे अजितदादांच्या बंडाळीचा किमान जिल्ह्यात फारसा परिणाम होणार नाही असे सध्याचे चित्र आहे. प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना आमदार शिंगणे यांनी’ मला दादांची ऑफर होती, पण ती विनम्रपणे नाकारली. मी मोठ्या साहेबांसोबतच राहणार आहे’, असे स्पष्ट केले.
हेही वाचा >>>मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांचा शरद पवारांना पाठिंबा
लवकरच मेळावा
दुसरीकडे अजित पवार गटातर्फे ‘ एमईटी’ ला आयोजित सभेला जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते हजर असल्याचा दावा दादा गटाचे शिलेदार तथा माजी जिल्हाध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील यांनी केला आहे. बुलढाण्यात लवकरच जंगी मेळावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.