लोकसत्ता टीम
बुलढाणा : येथे रविवारी पार पडलेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला सत्ताधारी राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे यांची गैरहजेरी देखील चर्चेचा विषय ठरली. मात्र, कार्यक्रम सुरू असताना माजीमंत्री शिंगणे मराठा समाज बांधवांच्या मोर्च्यात होते. यावेळी त्यांनी सरकारला धारेवर धरत पदाची तमा नसल्याचे ठणकावून सांगितले.
आणखी वाचा- Jalna Lathi Charge : ‘लाठीकाठी घेऊन शासन आपल्या दारी’; शरद पवार गटाचे नागपुरात आंदोलन
बुलढाण्यातील कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर असणे खमंग चर्चेचा विषय ठरला. यावर खुलासा झाल्यावर मग शिंगणे यांच्या गैरहजेरीची चर्चा रंगली. मात्र, यावेळी ते देऊळगाव राजात निघालेल्या मराठा समाजाच्या निषेध मोर्च्यात सहभागी झाले. यावेळी त्यांनी आक्रमक भाषण करताना, आम्ही सरकारमध्ये आहोत, सरकारजमा नाही. सत्तेत गेल्याने लाचार होऊन काम करणार नाही, असे ठणकावून सांगितले. मराठा समाजाला इतर कुणाचे आरक्षण कमी न करता संवैधानिक पद्धतीने हक्काचे आरक्षण हवे. त्यासाठी पदावर लाथ मारतो. म्हणून शासन आपल्या दारीला जाण्यापेक्षा मोर्च्यात सहभागी झाल्याचे आमदारांनी सांगितले.