भंडारा : सध्या सूर्य आग ओकत आहे. रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. असे असले तरी ग्रामीण भागातील नागरिकांना महत्वाच्या कामासाठी लोकप्रतिनिधींच्या कार्यालयात जावेच लागते. तळपत्या उन्हात आलेल्या नागरिकांची एक आमदार साहेब विशेष काळजी घेत आहेत. ‘अतिथी देवो भव’ म्हणतं हे आमदार साहेब त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला चहा ऐवजी आंबील प्यायला देऊन उष्म्यात मोठा दिलासा देत आहे. सध्या हा विषय चर्चेचा ठरत आहे.

लोकांचा आमदार म्हणून ओळख असलेल्या तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात गेलात की तुमच्या हातात आधी पाण्याचा पेला येतो. नंतर काटोकाठ आंबिलीने भरलेली प्लास्टिकची मोठी वाटी येते. कामासाठी गेलेल्या प्रत्येकाला हा विषय जरा नवा आणि आश्चर्यात टाकणारा असतो. पण उन्हाचे तटके सहन करून कामासाठी कार्यालयात दाखल झालेल्या प्रत्येकासाठी समोर आलेली ही आंबिल उन्हाळ्यात संजीवनी ठरत आहे.

काही लोकप्रतिनिधींची कार्यालय अशी आहेत जिथे साहेब असेल तरच येणाऱ्यांची विचारपूस होते. येथे मात्र आमदार साहेब असो की नसोत, तुमची दखल घेतली जाऊन सन्मान राखला जातो. लोकप्रतिनिधींच्या कार्यालयात आजपर्यंत चहा आणि मशीन द्वारा तयार होत असलेली कॉफी लोकांच्या हाती पडायची. मात्र आंबीलच्या वाट्या पाहून मतदार संघातून येणारा प्रत्येक जण समाधानानेच परत जात आहे. उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव करण्यासाठी ज्वारीची आंबील अत्यंत उपयुक्त समजली जाते. आजही ग्रामीण भागात घरोघरी ही आंबील तयार होते. कांदा आणि आंबील खाऊन घराबाहेर पडणारा शेतकरी दिवसभर शेतात काम करतो. कारण त्याच्या पोटात आंबलीचा आधार असतो. ग्रामीण भागातील ही आमची खाद्य संस्कृती आजही काही ठिकाणी टिकून आहे. याच संस्कृतीला आणखी व्यापक करण्याच्या दृष्टीने आमदारांचे हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे.

ज्याप्रमाणे चहा सकाळपासून त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात येणाऱ्या जाणाऱ्यांच्या हाती पडतो. त्याचप्रमाणे आंबिलीच्या वाट्याही प्रत्येकाच्या वाट्याला येतात. केवळ वरठी येथीलच नव्हे तर मोहाडी आणि तुमसर येथील जनसंपर्क कार्यालयातही हाच शिरस्थ पाळला जातो आहे. रोज ४० ते ५० लिटर आंबील तयार केली जात असल्याचे तेथील काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले. आता हक्काचा आमदार म्हटल्यानंतर त्याच्याकडे आंबोलीचा पाहुणचार घेण्यासाठी येणारेही तेवढेच हक्काचे असतील. येणाऱ्यांना पाणी चहा विचारणे ही संस्कृती जपताना आपल्या खाद्य संस्कृतीलाही आमदारांनी दिलेला सन्मान तेवढाच महत्त्वाचा आहे याची चर्चा होत आहे.

हे सर्व लोकांसाठीच: आ. कारेमोरे

ग्रामीण भागातील लोक आपल्या व्यथा घेऊन आमच्याकडे येतात. उन्हाताना प्रवास करून आलेल्या व्यक्तींना निवांत करण्यासाठी आणि उष्माघातापासून त्याचा बचाव व्हावा म्हणून आंबील हा प्रयोग आम्ही सुरू केला. चहाने नको ते आजार अंगलट येतात. मात्र आंबील ही आमच्या ग्रामीण खाद्य संस्कृतीचा अविभाज्य अंग असून पौष्टिक असल्याने हे सुरू करण्यात आले आहे.