अमरावती : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागात अनेक नव्या एसटी बस दाखल झाल्या आहेत. त्या जिल्ह्यातील विविध बस स्थानकांवरून सोडल्या जात आहेत. नवीन बसगाड्यांच्या सेवेचा शुभारंभ हा आमदारांच्या हस्ते करण्यात येत असताना आमदारांनाही या नवीन बस चालवण्याचा मोह आवरला आलेला नाही. रविवारी बडनेराचे युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी राजापेठ बसस्थानकावर नवीन बस चालवून अनेकांचे लक्ष वेधून घेतले. काही दिवसांपुर्वी अचलपूरचे भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी परतवाडा येथे ढोल ताशांच्या गजरात नवीन बस चालवली होती.

अमरावती विभागात १५ नवीन बसगाड्या मंजूर झाल्या असून रविवारी राजापेठ बस स्थानकावरून काही बसगाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. स्वत: आमदार रवी राणा यांनी बस चालवून सेवेचा शुभारंभ केला. यावेळी एसटी बस मध्ये विभाग नियंत्रक निलेश बेलसरे, आगार मॅनेजर वैशाली भाकरे, सांख्यिकी अधिकारी देशमुख व एसटी कर्मचारी वाहक, चालक उपस्थित होते.

युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. त्यांनी रवी राणा यांच्या समवेत प्रभू रामचंद्र की जय असा जयघोष केला. रवी राणा यांनी यावेळी प्रवाशांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. आमदार रवी राणा यांनी मतदारसंघात तसेच जिल्ह्यात दौरा करताना एसटी बसगाड्यांची विदारक परिस्थिती दिसून आली होती. त्यांनी मुख्यमंत्री, परिवहन मंत्री यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती.

रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व परिवहन मंत्री यांना अमरावती विभागात नवीन एस टी बसगाड्या उपलब्ध करून देण्यासाठी लेखी मागणी केली होती. याबाबत वाहतूक मध्यवर्ती कार्यालयातही पत्र दिले होते. या अनुषंगाने आमदार रवी राणा यांचा पाठपुरावा सुरू होता. त्या नुसार आज रामनवमी च्या शुभदिवशी १५ एस टी नवीन बसेस मंजूर करून दिल्या.

आगामी काळात अधिक पुन्हा नवीन बसेस मिळणार आहे. या संदर्भात मुंबई येथील मुख्य कार्यालयामधून आमदार रवी राणा यांना पत्र प्राप्त झाले आहे, अशी माहिती रवी राणा यांच्या जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे. चार दिवसांपुर्वी परतवाडा येथील बसस्थानकावर पाच नवीन बसगाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी बस चालवून प्रवाशांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. त्याची चर्चा आता रंगली आहे.