अमरावती : राधाकृष्ण विखे पाटील हे जेव्हा भाजपमध्ये प्रवेश करणार होते, तेव्हा यादीत काँग्रेसच्या तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांचेही नाव पाहिले होते. पण, त्यांनी मंत्रीपद मागितले होते. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्रीपद देण्यास नकार दिला. कोणत्याही अटीविना भाजपमध्ये या, असे फडवणवीस यांनी त्यांना सांगितले होते, असा दावा अपक्ष आमदार रवी राणा यांनी मंगळवारी तिवसा येथे बोलताना केला. तिवसा येथे युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीने आयोजित दहीहंडी कार्यक्रमात बोलताना रवी राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर टीका केली. तिवसा मतदार संघाला महिला आमदार, महिला मंत्री लाभूनही यशोमती ठाकूर यांनी जनतेचे भले करण्यापेक्षा स्वतःचे आणि आपल्या नातेवाईकांचे भले केले. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत यशोमती ठाकूरसुद्धा भाजपमध्ये जाणार होत्या, पण मंत्रीपदास नकार मिळाल्याने त्या काँग्रेसमध्ये थांबल्या, असे राणा म्हणाले.
आपल्यासाठी मंत्रीपदापेक्षा जनसेवा महत्त्वाची आहे. मी सावकाराच्या घरात जन्माला आलो नसून एका कष्टकरी कामगाराचा मुलगा आहे, जनतेचे आशीर्वाद व प्रेम हीच माझी शक्ती आहे. जनतेच्या आशीर्वादाने तीन वेळा आमदार झालो आहे, शेतकरी शेतमजूर यांच्या मागण्यांसाठी आपण केलेले आंदोलन दडपण्याचे प्रयत्न झाले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्यासह तिवसा तालुक्यातील ५६ शेतकऱ्यांना ऐन दिवाळीच्या दिवशी तुरुंगात टाकले होते, शेतकरी शेतमजूर हा घाव विसरले नसून या निवडणुकीत मग्रूर लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखविणार असल्याचा दावा रवी राणांनी केला. यावेळी दहीहंडी कार्यक्रमात खासदार नवनीत राणा, चित्रपट कलावंत तुषार कपूर यांनी हजेरी लावली.