अमरावती : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी आमदार रवी राणा सोडत नाहीत. उद्धव ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर रवी राणांनी त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
”उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना विदर्भात कधी तोंड दाखवले नाही, करोना काळात कधी मंत्रालयात गेले नाहीत. कधी विदर्भातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले नाहीत आणि आज पावसाळ्यातील बेडकासारखे बाहेर निघाले आहेत. विदर्भाच्या दौऱ्यावर ते आले आहेत. अमरावतीतही ते येणार आहेत. मुख्यमंत्रीपदावर असताना महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून मातोश्रीवर बसले होते, तेव्हा महाराष्ट्रातील जनता त्रस्त होती. आता पुन्हा विदर्भात पावसाळ्यातील बेडकासारखे येऊन मतांची भीक मागत आहेत. लोकांची दिशाभूल करताहेत”, अशी टीका रवी राणा यांनी केली आहे.
हेही वाचा – गोंदिया : टी-१ वाघिणीची मध्यप्रदेशच्या दिशेनं वाटचाल; आमगाव – सालेकसा तालुक्यात दहशत
रवी राणा म्हणाले, ”उद्धव ठाकरे हे लक्षात ठेवा, तुम्ही मुख्यमंत्री असताना काही करू शकले नाही, आता तर तुमचे चाळीस आमदारही सोडून गेले. सत्ता गेली. शिवसेना पक्ष गेला. फक्त हनुमान चालिसाचा विरोध करून एका खासदार, आमदाराला तुम्ही तुरुंगात टाकले, म्हणून ही स्थिती ओढवली आहे. जो प्रभू श्रीरामाचा नाही, हनुमानाचा नाही, तो कुण्या कामाचा नाही, त्यामुळे विदर्भात येऊन तुम्ही कितीही थापा मारल्या, तरी तुम्ही काय आहात, तर पावसाळ्यातील बेडूक आहात, हे विदर्भातील जनता ओळखून आहे,” अशी बोचरी टीका रवी राणा यांनी केली आहे.