अमरावती : वर्धा आणि अकोला येथील कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे बुधवारी दुपारी येथील बेलोरा विमानतळावर आगमन झाले. आमदार रवी राणा यांनी विमानतळावर पोहचून त्यांचे स्वागत केले. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत रवी राणांनी सुमारे दहा मिनिटे चर्चा केली. खासदार नवनीत राणा यांच्या भाजप प्रवेशाची उत्सुकता ताणली गेली असताना या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.
हेही वाचा >>> जोरगेवार, पुगलिया, ॲड. चटप व ॲड.गोस्वामी यांचे पाठबळ कुणाला? भूमिकेकडे मतदारांचे लक्ष
दोन्ही नेत्यांचे दुपारी २ वाजता बेलोरा विमानतळावर आगमन झाले आणि त्यानंतर ते पुढील प्रवासासाठी रवाना झाले. यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेतली असता आमदार रवी राणा म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे दोन्ही नेते वर्धा आणि अकोला येथील कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी जाणार होते. त्यांचे विमान बेलोरा विमानतळावर उतरले. आपण दोन्ही नेत्यांच्या स्वागतासाठी गेलो. त्यांचे मी नेहमीच स्वागत करतो. यावेळी राजकीय चर्चा झाली नाही.
हेही वाचा >>> नरेंद्र मोदी, अमित शहांमध्ये औरंगजेबी वृत्ती; उद्धव ठाकरेंचा घणाघात, म्हणाले ‘यंदा देशात परिवर्तन अटळ’
नवनीत राणा यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत मिळाले आहेत का, असे विचारले असता रवी राणा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हे नवनीत राणा यांच्या संसदेतील कामगिरीविषयी समाधानी आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेल्या १३ वर्षांपासून आपण काम करीत आहोत. त्यांनी आम्हाला नेहमीच पाठिंबा दिला आहे. नवनीत राणा यांच्या उमेदवारीविषयी सकारात्मक संकेत मिळाले आहेत, असे आपण यापूर्वीही सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस जो काही आदेश देतील, त्याचे पालन आपण करणार आहोत. बेलोरा विमानतळावर स्वागतासाठी युवा स्वाभिमान पक्षाचे राष्ट्रीय सचिव जयंतराव वानखडे देखील उपस्थित होते. एक-दोन दिवसांत नवनीत राणा यांच्या उमेदवारीची घोषणा होईल, असा दावा त्यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना केला.