Ravi Rana On Anil Parab ED Raid: शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरूद्ध सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई सुरू केल्यानंतर आमदार रवी राणा यांनी परब यांचा एकेरी उल्लेख करून त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
“ज्या पद्धतीने राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून अनिल परब यांनी नवनीत राणा यांच्या सारख्या महिलेला तुरुंगात डांबले, हनुमान चालिसाचा अपमान केला. भगवंतांचा अवमान केला. याची शिक्षा अनिल परब यांना नक्कीच मिळेल. त्यांच्या पापाचा घडा हा पूर्ण भरलेला आहे. म्हणून अनिल परब यांच्यावर जी कारवाई झाली आहे, ती महाराष्ट्रातील जनता सर्व पाहत आहे,” असे रवी राणा म्हणाले. राणा दाम्पत्य सध्या नवी दिल्ली येथे असून रवी राणा यांनी ध्वनिचित्रफितीद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“अनिल परब हे मातोश्रीचे खजिनदार आहेत. सरकारमधील कलेक्शन करून मातोश्रीवर नोंद ठेवण्याची मोठी जबाबदारी ते पार पाडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हाताशी घेऊन त्यांनी अनेक वाईट काम केली आहेत. आता त्यांच्या पापाचा घडा भरला आहे,” अशी टीका रवी राणा यांनी केली आहे.
“उद्धव ठाकरेंचा सगळ्यात जवळचा मंत्री, जो सरकारचे कलेक्शन करून मातोश्रीवर पोहोचवून देण्याचे काम करतो. सचिन वाझेच्या माध्यमातून अनिल परब यांनी अनेक कामे करून घेतली. मोठ्या प्रमाणावर एसटी महामंडळात अनिल परब यांनी भ्रष्टाचार केला,” असा आरोपही रवी राणा यांनी केला आहे.
“अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा छळ केला. एसटी कर्मचाऱ्यांनी आपली दिवाळीही साजरी केली नाही. त्यांची दिवाळी अंधारात गेली. पाच-सहा महिने त्यांनी आंदोलन केले, पण अनिल परब यांनी उद्धट भाषेत बोलून तसेच अहंकारातून एसटी कर्मचाऱ्यांचा छळ केला. त्यामुळे दीडशेच्यावर एसटी कामगारांनी आत्महत्या केली. त्या सगळ्यांचा शाप अनिल परब यांना लागणार आहे. आणि उद्धव ठाकरेंना हाताशी घेऊन अनेक कारस्थाने अनिल परब यांनी राज्यात केली आहेत. ती सर्व आता बाहेर येतील आणि अनिल परब हे तुरुंगात जाणार याचे पूर्ण संकेत आहेत,” असा दावा रवी राणा यांनी केला आहे.