लोकसत्ता टीम
यवतमाळ : कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील वरूड (तुका) या गावात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला व एकल महिलांसोबत भाऊबीज साजरी करणार आहेत. हा कार्यक्रम १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. ‘ग्रामहित’ संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
आणखी वाचा-नागपूर : दिवाळीचा बोनस न देणाऱ्या मालकाचा खून
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांची कारणे तसेच एकल महिलांच्या प्रश्नांना समजून घेणे, एकल महिलांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा रहावा, नव्या नेतृत्वाने एकल महिलांच्या व्यथा, प्रश्न नीट समजून घेऊन त्याला विधिमंडळामध्ये प्रश्नांकित करावे, या हेतूने हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे ग्रामहीत संस्थेचे संस्थापक पंकज महल्ले, श्वेता ठाकरे (महल्ले) यांनी सांगितले. हा संपूर्ण कार्यक्रम अराजकीय असून सर्व एकल भगिनी रोहित पवार यांचे औक्षण करतील आणि कर्त्या पुरुषाच्या मृत्यूनंतर संसार पुढे चालवताना त्यांना येणाऱ्या अडचणी त्यांचे पुढे मांडतील. संपूर्ण दिवसभराचा वेळ या महिलांसाठी राखीव ठेवून आमदार रोहित पवार त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. रोहित पवार यांचे कुटुंबीयही या कार्यक्रमासाठी येणार आहे.