वर्धा : शासनाने अकरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांची घोषणा केली अन् जिल्ह्यात वादालाच जणू तोंड फुटले. शासनाने घोषणा करतानाच महाविद्यालयाची जागाही निश्चित करून टाकली. वर्धेलगत सातोडा येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार आहे. मात्र, यावरून आ. डॉ. पंकज भोयर आणि आ. समीर कुणावार यांच्यावरील दबाव वाढत चालला आहे. आमदारकी पणाला लावून या आमदारद्वयांमधील कोण बाजी मारणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा >>> नागपूर : पवार यांच्या कडून गडकरींच कौतुक आणि काही सूचनाही , काय म्हणाले ….
शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाची घोषणा होताच सर्वप्रथम हिंगणघाटकर सरसावले. स्वयंसेवी संस्था पुढे आल्या. हिंगणघाट येथेच हे महाविद्यालय झाले पाहिजे म्हणून सूर वाढू लागला. येथील आ. समीर कुणावार यांना भेटून निवेदन देण्यात येत आहे. त्यांचे विरोधक तर रस्ते, नाल्या, देणगी एवढेच काम नसते. शहरासाठी हे काम झालेच पाहिजे. त्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावावी, असे सल्ले आ. कुणावार यांना समाज माध्यामातून देत आहेत. यावर बोलताना आ. कुणावार म्हणतात की, विरोधकांनी त्यांची सत्ता असताना येथील उपजिल्हा रुग्णलयाचा दर्जा वाढविण्यासाठी काय केले ते आधी सांगितले पाहिजे. वैद्यकीय महाविद्यालय इथे व्हावे ही माझीही इच्छा आहे. तसे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. शेवटी शासन निर्णय मान्य करावा लागेल. आ. डॉ. पंकज भोयर म्हणतात की, शासनाचा निर्णय झाला असल्याने यावर अधिक भाष्य करता येणार नाही. एक मात्र तेवढेच खरे की आमदार कुणावार यांच्यावरील दबाव रोज वाढत चालला आहे. ते आमदारकी पणाला लावणार का, असाही चर्चेतील प्रश्न आहे.